KINWATTODAYSNEWS

रंगकर्मीच्या वतीने प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांचा नांदेडला सत्कार नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रशांत दामले यांनी साधला रंगकर्मीशी संवाद

नांदेड, दि.२३ (प्रतिनिधी)-कलावंत व अभिनेता म्हणून आम्ही तीन तास नाटक करतो, नाटकातील सर्व संवाद पाठ करुन ते उत्कृष्ट हवभावासह सादर करतो मात्र राजकीय मंडळींना सकाळपासूनच २४ तास वेगवेगळे अभिनय करावे लागतात. मराठवाड्यातील रसिक वर्ग चोखंदळ असून, संवेदनशिल व कलावंतांना दाद देणारे आहेत. या शब्दात सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नांदेड शहरातील विसावा पॅलेस येथे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात नांदेड शहरातील रंगकर्मीशी त्यांनी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. नियामक मंडळासाठी अभिनेते मोहन जोशी व प्रशांत दामले यांच्या पॅनलमध्ये नांदेड येथील प्रख्यात रंगकर्मी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाची विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी ही पदवी डॉ.राम चव्हाण यांना नुकतीच प्राप्त झाली आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या सामाजिक, कौटुंबिक व भावनिक नाट्य प्रयोगात तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धेत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका करुन आपला ठसा उमटवला आहे. यावेळी पहिल्यांदाच नांदेड विभागातून नियामक मंडळाची निवडणूक होत आहे. रंगकर्मीशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठाण नांदेडने विसावा पॅलेस येथे घडवून आणला. यावेळी सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांना नुकताच संगीत कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच राज्य शासनाच्या वतीने १२ हजार ५०० नाट्यप्रयोग केल्याबद्दल त्यांचा नुकताच राज्य शासनाच्या वतीने जाहीर सत्कार झाला. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदेडच्या रंगकर्मीच्या वतीने त्यांचा माजी मंत्री डी.पी.सावंत, प्रभाकर गादेवार, डॉ.राम चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पिंपरी चिंचवडचे नियामक सदस्य भाऊसाहेब भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रशांत दामले यांनी रसिकांच्या व नाट्यकर्मीच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. रंगचर्चेच्या माध्यमातून यावेळी रंगकर्मीनी नाट्य परिषदेच्या कामकाजाबद्दल तसेच येणार्‍या काळात हौशी कलावंतांना व अन्य कलावंतांना संधी देण्याबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. आम्ही कलावंत तीन तासांचे नाटक करतो, नाटकातील संवाद पाठ करुन उत्कृष्ट अभिनयासह नाटक सादर करतो. मात्र राजकारणी मंडळींना २४ तास अभिनय करावा लागतो. राजकारणी नेत्यांना दिवसभर घडणार्‍या वेगवेगळ्या प्रसंगावर अभिनय करावा लागतो. मराठवाड्यातील रसिक,प्रेक्षक हा चोखंदळ व संवेदनशिल असून नाटक सुरु असताना ते ज्या भावना व्यक्त करतात आणि दाद देतात त्यातून आम्हाला स्फूर्ती मिळते, असेही प्रशांत दामले म्हणाले.
डी.पी.सावंत यांनी आपल्या भाषणात नांदेडच्या कला क्षेत्राचा आढावा घेवून येथील कलावंतांना मुंबईसारख्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, अशा अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात होणार्‍या विविध उपक्रमात नांदेडच्या रंगकर्मीना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले. सुरुवातीला प्रास्ताविकात नियामक मंडळाचे उमेदवार डॉ.राम चव्हाण यांनी आपली या निवडणुकीतील भूमिका समजावून सांगत निश्चितच सर्वांशी असलेला सलोखा व मैत्री या माध्यमातून आपण या निवडणुकीत निवडून येऊ, तुमच्या सर्वांचे सहकार्य मला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित प्रशांत दामले, डी.पी.सावंत यांनीही राम चव्हाण यांच्या कार्याचे कौतूक करुन त्यांना या निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे प्रशांत दामले यांच्या पॅनलमधून यापूर्वीच १८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगकर्मी दिनेश कवडे तर आभार प्रदर्शन अशोक माडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी जाधव,विजयकांत सूर्यवंशी, गौतम गायकवाड, सुधांशू श्यामलेट्टी, रवी जाधव यांनी परिश्रम घेतले.

89 Views
बातमी शेअर करा