*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असंख्यजणांची उपजिविका उपलब्ध असलेली शेती व पशुधनावर अवलंबून आहे. यात आदिवासीसह बंजारा व त्यातल्या त्यात मथुरा लभान सारख्या अत्यल्प संख्या असलेलाही समाज आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर व याचबरोबर शेतकऱ्यांचाही नैराश्याचा कल अधिक असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी थेट गावांना भेटी देऊन शेतकरी, समाज प्रमुखांशी चर्चा सुरु केल्या आहेत. त्यांनी नुकतीच करंजी गावाला भेट दिली. येथील महंत भागचंद मशन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथेच त्यांचा इतर वरिष्ठ धर्मगुरू समक्ष ग्राम बैठक घेतली. दुपारी सुरू झालेल्या या ग्रामबैठकीला गावकऱ्यांनी झाडून हजेरी दिली.
“शेतीची उकल सोपी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नानाविविध योजना हाती घेतल्या आहेत. शेतीपूरक उद्योगावर भर दिला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेसमवेत महाराष्ट्र शासनाने आणखी 6 हजार रुपयाची भर घातली आहे. वर्षाला 12 हजार रुपये ही सरळ मदत मिळणार असून आम्ही तुमच्य खंबीरपाठीशी आहोत. याचबरोबर या परिसरात महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने विशेष लक्ष ही प्रशासनातर्फे दिले जात आहे. “कली उमलतांना” या नाविन्यपूर्ण मोहिमेंचाही आपण शुभारंभ केला असून मथुरा लभान समाज व इतर समाजातील व्यक्तीने अधिक सकारात्मक लोकसहभाग शासनाच्या या योजनेत घ्यावा.
– जिल्हाधिकारी अभिजित राऊत