KINWATTODAYSNEWS

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जलधारा , इवळेश्वर येथील आरोग्य केंद्रासाठी ३ कोटी १५ लक्ष रु .निधी मंजूर

किनवट/प्रतिनिधी ;

हिंगोली लोकसभा मतदार संघातील आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे आदिवासी उपाययोजनेंतर्गत किनवट तालुक्यातील जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामास आणि माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथील नवीन कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून याकरिता एकूण ३ कोटी १५ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. याकामी नांदेड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य व अर्थ समिती सभापती सौ. पदमा नरसारेड्डी -सतपलवार यांनी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता. लवकरच बांधकामास सुरवात होणार आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदार संघाचा दौरा करून हिंगोली ,नांदेड, यवतमाळ जिल्हयातील आरोग्य केंद्राची पाहणी केली होती, यादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव आढळून आला होता. त्यानुसार संबंधितांना सूचना करून तात्काळ सर्व यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नांदेड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात नांदेड जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागासाठी आदिवासी उपाययोजनेंतर्गत कोविड च्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सक्षम आणि मजबूत करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर या आदिवासी दुर्गम भागात नवीन आरोग्य केंद्रांची स्थापना , परिरक्षण आणि बांधकामे करण्यासाठी मंजूरी देण्यात आली . त्यानुसार किनवट तालुक्यातील जलधारा येथील मोडकळीस आलेली जुनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पडून त्या जागी नवीन इमारत बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे या कामाकरिता एकूण २ कोटी २० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे . तसेच माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या कर्मचारी निवासस्थानास मंजूरी देण्यात आली आहे या कामासाठी एकूण ९५ लक्ष रुपये असा एकूण ३ कोटी १५लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे .
याकामी खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य व अर्थ समिती सभापती सौ. पदमा नरसारेड्डी -सतपलवार यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत . आदिवासी बहुल भागात नव्याने होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना वेळेत उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

209 Views
बातमी शेअर करा