KINWATTODAYSNEWS

मोरक्को येथे होणाऱ्या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड*

महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव महिला खेळाड

नांदेड- दि.१९ येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, तथा नांदेड जिल्ह्याची भूमिकन्या महाराष्ट्र भूषण भाग्यश्री माधवराव जाधव यांची उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात होणाऱ्या वर्ल्ड पॅराअथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिग्झ 2023 सातव्या आंतराष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी नेहमी प्रमाणे महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव महिला खेळाडू आहे.

नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई केली आहे.
दुबई येथे झालेल्या फाजा चॅम्पियनशिप व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर सन २०२१ मध्ये टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
बेंगलोर येथे गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
नोव्हेंबर 2022 मध्ये पोर्तुगाल येथे जागतिकस्तरावर झालेल्या आयवॉज २०२२ या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत गोळाफेक क्रीडा प्रकारात रौप्य मिळवून भारताबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक केला.
येत्या ७ मार्च ते १२ मार्च या कालावधीत उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स २०२३ ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पॅरालिंम्पिक कमिटीने देशभरातील केवळ बारा खेळाडू यांची निवड केली आहे. त्यामध्ये भाग्यश्री जाधव यांचा समावेश आहे. या स्पर्धेत ती पुन्हा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.या स्पर्धेसाठी निवड झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे.
अवघ्या सहा वर्षाच्या क्रीडा प्रवासात भाग्यश्री जाधव यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या निवडी बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भाग्यश्री जाधव म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यासह देशाचे प्रतिनिधीत्व करताना प्रचंड दडपण असते. त्यामुळे सरावासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी डायट, न्यूट्रिशन, जीम व प्रशिक्षक, नियमित प्रशिक्षक यांचे मानधन त्याच बरोबर शारिरिक व मानसिक तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी दर महिन्याला जवळपास लाखाच्या आसपास खर्च होतो. हा खर्च भागवताना नाकी नऊ येतात. महाराष्ट्र सरकार दखल घेऊन तात्काळ शासकीय सेवेत रुजू करून घेत नाही आणि मदतीचे गाजर दाखवणारे काही लोक कोपराला गुळ लावतात. अशा विदारक परिस्थितीमुळे क्रीडा प्रवासाला पुर्णविराम द्यावा की काय? असे कधी कधी वाटते. ही माझीच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिव्यांगासह सर्व खेळाडू यांची आहे. राज्यात क्रीडा क्षेत्रात अनेक कोहीनूर हिरे आहेत. पण आर्थिक विवंचने मुळे ते हतबल होतात त्यामुळे आपोआप स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांचा क्रीडा प्रवास सुरू झाल्या बरोबर लगेच संपतो. अशा गुणी रत्नांची समाजाला ओळखच होत नाही. त्यांच्यात दडलेल्या सामर्थ्याला शक्ती देणे, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी मदतीचा हात देण्याची आज खरी गरज आहे.
महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे लोक प्रतिनिधी यांनी क्रीडा अनास्थेकडे लक्ष घालून सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेणे आज अत्यंत आवश्यक आहे अशी भावना भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केली.

163 Views
बातमी शेअर करा