KINWATTODAYSNEWS

नांदेड मध्ये १ ते ३ मार्च दरम्यान रंगणार कुसुम महोत्सवचे आयोजन*वैशाली सामंत,वैभव मांगले, अनुश्री फडणीस,मधुरा वेलणकर,योगेश सोहनी आदी दिग्गजांचा सहभाग

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.30.देशाचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या सहचारिणी कै.सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दि. १ ते ३ मार्च २०२३ दरम्यान नांदेड येथे ‘कुसुम महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत, सुप्रसिध्द अभिनेते वैभव मांगले,अभिनेत्री अनुश्री फडणीस,मधुरा वेलणकर,योगेश सोहनी आदी दिग्गजांचा प्रमुख सहभाग असेल. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण यांच्यासह सुजया व श्रीजया अशोकराव चव्हाण या भगिनींनीही कुसुम महोत्सवाच्या नियोजनासाठी पुढाकार घेतला आहे.

हा तीन दिवसीय महोत्सव येथील यशवंत महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात होणार असून, महोत्सवाच्या काळात दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत महिलांनी व तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

त्यासाठी सुमारे १०० स्टॉल्स उभारले जातील.कुसुम महोत्सवाचे उद्घाटन १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत व अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री अनुश्री फडणीस करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ६.३० वा.वैशाली सामंत यांच्या सुमधूर बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वा.मराठी वेषभूषेची गौरवशाली परंपरा सांगणारा ‘मराठमोळी’ हा फॅशन शो होणार आहे. यामध्ये अनेक स्थानिक महिला व युवती सहभागी होतील.परीक्षक म्हणून मधुरा वेलणकर,योगेश सोहनी, अनुश्री फडणीस जबाबदारी सांभाळणार आहेत.

शुक्रवार दि.३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वा.विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाची मोहर उमटविणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मानाने गौरव करण्यात येईल. याच दिवशी नृत्य संगीताचा कलाविष्कार ‘आदिशक्ती हा कार्यक्रम होणार आहे.

महिला शक्तीचा जागर व सक्षमीकरणासाठी आयोजित कुसुम महोत्सवामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजिका सौ.अमिताताई चव्हाण,कु. सुजया अशोकराव चव्हाण व कु. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

58 Views
बातमी शेअर करा