मुंबई, दि. ३ फेब्रुवारी
अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराचा फुगा फुटला असून मोदींच्या या उद्योगपती मित्रामुळे देशातील करोडो सामान्य गुंतवणुकदारांचा पैसा परत मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियातील सामान्य जनतेचा पैसा अदानीच्या कंपनीत मोदींच्या हट्टामुळे गुंतवण्यात आला. आता अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्याची हिम्मत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या कधी दाखवणार? असा प्रश्न मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया सह इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील गुंतवणुकदारांचा व खातेधारकांचा पैसा अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. अदानीवर मोदी सरकार मेहरबान आहे. पंतप्रधान मोदींच्या मर्जीमुळेच अदानी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या पहिल्या तीन मध्ये जाऊन बसले होते. अदानी समुहात गौडबंगाल असून हा फुगा लवकरच फुटेल असे भाकीत काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी यांनी केले होते आणि त्यानंतर अदानीचा भांडाफोड झाला. दोन दिवसात तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, हे नुकसान अदानीचे नसून सरकारी वित्तीय सामान्य गुंतवणुकदारांचे नुकसान आहे.
अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून अदानी सुमहाला ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या घोटाळ्यामुळे हा पैसा परत मिळेल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ५-१० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची आवाई उठवत ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून चौकशी करावयास लावून त्यांच्यावर कारवाई करण्याची नौटंकी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या करत असतात. आता अदानींचा एवढा मोठा घोटाळा उघड झाला असताना किरीट सोमय्या गप्प कसे? ईडी कारवाईची मागणी का करत नाहीत? केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी न केलेला घोटाळा सोमय्यांना दिसतो का? किरिट सोमय्या यांना खरेच भ्रष्टाचार संपवायचा असेल व भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा ठोठावायची असेल तर अदानीची गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी करुन दाखवावी, असे आव्हानही राजहंस यांन दिले आहे.
किरीटभाई, अदानीच्या महाघोटाळ्याची ‘ईडी’ चौकशी कधी करणार ? काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
51 Views