*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.तामसा – नांदेड रोडवर असलेल्या पाटबंधारा विभागाच्या लोहा पाटीलजवळील पिंपराळा तलावाच्या निर्मितीपासून उभारण्यात आलेला व तलावावर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा निधी खर्च करून बांधण्यात आलेला डाकबंगला अज्ञाताने जेसीबीच्या साह्याने रातोरात उध्वस्त केला असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरी कुंभकर्णी झोपेत असलेले तामसा पाटबंधारे विभागाने यावर अद्याप कुठली कारवाई केली नसल्याने पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
तामसा पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या तामसा – नांदेड रोडवरील लोहापाटीलजवळ असलेल्या पिंपराळा तलावाच्या निर्मितीपासून तलावावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाचा मोठा निधी खर्च करून एक विशेष दगडी पक्के बांधकाम केलेले निवासस्थान अर्थात डागबंगला बांधण्यात आला होता. काही वर्षापासून ह्या डागबंगल्याची कमालीची मोडतोड झाली होती. त्यामुळे डाग बंगल्याचा वापर बंद झाला होता. त्याकडे पाटबंधारे विभागाने देखील दुरुस्तीच्या उद्देशाने कधीच बघितले नाही.
राहण्यास अयोग्य आणि पडझड झालेल्या डाकबंगल्याकडे तामसा पाटबंधारे विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले होते.तेथे कोणीही राहत नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळी अनेक अनुचित प्रकार सातत्याने घडत असल्याचे जवळपासच्या नागरिकांनी बोलून दाखवले होते.कालांतराने पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हा डाकबंगला बेवारस झाला होता.याचाच फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तो डाकबंगला जेसीबीच्या साह्याने रातोरात उध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.असे असताना तामसा पाटबंधारे विभागाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन साधी विचारपूस करण्याचे औदार्य दाखवलेले नाही.किंवा कुठलीही कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे नेमका हा डाकबंगला कोणाचा? त्या बंगल्याची जागा नेमकी कोणाची? हा संशोधनाचा विषय बनला आहे.