नागपूर/प्रतिनिधी- सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सेवाग्राम ते नागपूर विधानभवनावर जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने ३ दिवसीय पायी पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील लाखो कर्मचारी काल सहभागी झाले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये जुनी पेन्शन बाबत सकारात्मक पावले उचलू परंतु सध्या मयत झालेल्या कर्मचारी कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्यूटी चे लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यानी आश्वस्त केल्याची माहिती बोलताना दिली आहे.
२५ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथून राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, गोविंद उगले, प्राजक्त झावरे, अशितोष चौधरी, प्रवीण बडे, सुनील दुधे, आंदोलन प्रमुख नदीम पटेल, मनिषा मडावी, संजय सोनार, दिपीका एरंडे, मिलिंद सोळंकी, बालाजी मोटे, संतोष देशपांडे, श्रीनाथ पाटील, विनायक चौथे, अनिल वाकडे, सिकंदर पाचमासे, सागर खाडे, कुणाल पवार, अमोल माने,सोनार मामा, यांच्या नेतत्त्वाखाली सुरू झालेल्या या पद यात्रेचा समारोप काल नागपूर विधिमंडळावरील धडक मोर्चाने झाला. यामध्ये राज्यभरातून सर्व विभागातील लाखो कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यानी मयत कर्मचारी कुटुंबीयांचा आक्रोश व मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शनच्या आकडेवारीबाबत विधिमंडळात केलेली दिशाभूल विरोधातील रोष दाखवून दिल्याचे चित्र स्पष्ट होते. मोर्चा दरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी भेट देवून सहभाग घेतला. आमचे सरकार आल्यास आम्ही सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांचा हा शब्द महाराष्ट्रात पूर्ण करण्यास भविष्यात आम्ही कटिबद्ध राहु असा शब्द यावेळी पटोले यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आ. रोहित पवार यांनी मोर्चाला संबोधित करताना म्हटले की, कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन मिळणे हा हक्क आहे. सरकार कोणाचे ही असो ते त्यांना मिळायला हवे. यावर होणारा खर्च हा खर्च नसुन ते दायित्व आहे. भले यासाठी इतर एखादा खर्च कमी करून हे दायित्व निभावले पाहिजे. याबाबत चा मुद्दा मी विधीमंडळात उपस्थित करील, मी व्यक्तिशःतुमच्या सोबत असल्याचे म्हटले.
कर्मचाऱ्यांचे पाठीराखे आ.कपिल पाटील, आ.विक्रम काळे, आ.अभिजित वंजारी, आ. सुधीर तांबे, आ.जयंत असगावकर, आ.रणजीत पाटील, आ.किरण सरनाईक यांनीही भेट दिली. यावेळी आ. कपिल पाटील यांनी सांगितले की, आपला आजचा मोर्चा उस्फुर्त आणि अभूतपूर्व होता. यामुळे आज विधीमंडळात ३ वेळा यावर चर्चा झाली. आपला हा लढा समतेचा आहे. परंतु सरकार चूकीची आकडेवारी देवून स्वतःचीच फसवणूक करत आहे. कर्मचाऱ्यांच्या समतेच्या या जुनी पेन्शनच्या लढ्यात एक कार्यकर्ता म्हणून विधीमंडळात आणि बाहेर देखील मी कायम आपल्यासोबत आहे. यावेळी अनेक कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांनी आपली मनोगते व्यक्त करत पाठिंबा दिला. दरम्यान मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामोरे गेले. यावेळी आपण जुनी पेन्शन योजनेची मागणी लावून धरली. यावर मुख्यमंत्र्यानी त्याबाबत आपण चर्चा करून योग्य मार्ग काढू, परंतु तात्काळ पुढील १५ दिवसांत मयत कर्मचारी कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रज्युटी देण्याचे मान्य केले. सरकारचे हे म्हणणे न पटल्याने संघटनेने आपले आंदोलन रात्री उशीरा पर्यंत सुरूच ठेवले. त्यानंतर याविषयी मुख्यमंत्र्यानी स्वतःच्या *राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांनी स्वतः अधिकृत याबाबत ट्विट* मीडिया हॅण्डल वर याविषयी जाहीर केल्याने, काही कालावधी साठी आंदोलन स्थगित करण्यात आले.
या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास चार हजार कर्मचारी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या विविध विभागातील सर्व कर्मचाऱ्याचे, जेष्ठ संघटनेच्या राज्य, जिल्हा तथा तालुका पदाधिकाऱ्यांचे व सर्व पेन्शन शिलेदारांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष भालचंद्र धांडे, जिल्हाध्यक्ष विपीन धाबेकर, माजी जिल्हाध्यक्ष दुशांत निमकर, जिल्हा सरचिटणीस निलेश कुमरे तथा सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी आभार मानले आहे.
कुटुंबनिवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; जुनी पेन्शनच्या मागणीसाठी लाखो कर्मचाऱ्यांचा सहभाग
522 Views