KINWATTODAYSNEWS

अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात तेलंगणाच्या बी.आर.एस.ची एन्ट्री * तेलंगणा राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत किनी ता.भोकर येथे अनेकांनी केला या पक्षात प्रवेश

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.23.भोकर एकीकडे कर्नाटक -महाराष्ट्र सिमावर्ती मराठी भाषिकांचा प्रश्न ऐरणीवर असतांनाच महाराष्ट्रातील सिमावर्ती तेलगू भाषिक नागरिकांना तेलंगणा राज्य सरकारच्या योजनांच्या आकर्षण झाले आहे.त्या राज्यातील सत्ताधारी पक्षाचा सिमावर्ती महाराष्ट्रात विस्तार करण्यास सुरुवात झाली असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून सर्वपरिचित असलेल्या भोकर तालुक्यातील मौ.किनी येथे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती(बी.आर.एस.)पक्षाच्या वतीने वन व पर्यावरण राज्यमंत्री अमोल इंद्रकरण रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ डिसेंबर रोजी ‘त्या’ पक्षाच्या विस्तारीकरणाचा व रेड्डी समाज बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न झाला आहे.या सोहळ्यातून भोकर विधानसभा मतदार संघात भारत राष्ट्र समिती पक्षाची एन्ट्री झाल्याने येथील विविध राजकीय पक्षांत अस्वस्थता पसरली असून या सोहळ्यास काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती ही बाब विशेषतः लक्षणीय ठरली आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट,हिमायतनगर,भोकर,धर्माबाद,बिलोली,देगलूर या तालुक्यातील अनेक गावे तेलंगणा राज्याच्या सिमावर्ती भागात येतात.या तालुक्यातील अनेकांची शेती तेलंगणा राज्यात आहे.तर तेलंगणा राज्यातील सिमावर्ती नागरिकांची शेती या भागात आहे.येथील अनेक नागरिक तेलगू भाषिक आहेत.तसेच तेलंगणा राज्यातील विद्यमान राज्य सरकार हे शेतकरी व नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी शासकीय योजना राबवित आहे.त्याचे आगळे वेगळे आकर्षण येथील नागरिकांना आहे.त्यामुळे येथील नागरिकांना तेलंगणा राज्यातील या सत्ताधारी पक्षाचा आपल्या भागात विस्तार व्हावा असे वाटत आहे.

याच अनुषंगाने भारत राष्ट्र समिती(बी.आर. एस.)पक्षाचे विद्यमान वन व पर्यावरण मंत्री अमोल इंद्रकरण रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत मौ.किनी ता.भोकर येथे दि.२२ डिसेंबर २०२२ रोजी बी.आर.एस.पक्ष विस्तारण व रेड्डी समाज बांधव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात संपन्न झालेल्या या सोहळ्यात अनेकांनी ‘त्या’ पक्षात प्रवेश केल्याने सदरील पक्ष विस्तारासाठी भोकर तालुक्यातील नागरिक ही आता एकवटले आहेत,असे बोलल्या जात आहे.

सदरील सोहळ्यास तेलंगणातील मुधोळ मतदार संघाचे विद्यमान आमदार गडन्ना विठ्ठल रेड्डी,जि.प.सदस्य सावली रमेश,किनीचे माजी सरपंच तथा काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष नरसारेड्डी गोपीलवाड,किनीचे सरपंच प्रतिनिधी भुमारेड्डी गड्डमवाड,माजी सरपंच तिरपत रेड्डी,नरसा रेड्डी,रामकृष्ण रेड्डी,महिपाल रेड्डी,बाशेट्टी राजेन्ना,बी.शामसुंदर,व्यंकटराम रेड्डी,गंगाचरण,गणेश जाधव,शंकर चव्हाण यांच्यासह निर्मल,म्हैसा,कुबेर येथील बी.आर.एस.चे अनेक पदाधिकारी यांसह किनी,पाळज,दिवशी व भोकर येथील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री अमोल इंद्रकरण रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना म्हणाले की,भाजप सरकारने भारतीयांची घोर निराशा केली आहे.अदानी,अंबानी यांच्या हाती उद्योग देण्याचा सपाटा लावला आहे.तर तेलंगणा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्यात येते,तसेच दोन हप्त्यांत १० हजार रुपये देणारे हे पहिले राज्य आहे.

पेन्शन योजना राबवून गोरगरीबांना दिलासा देण्यात येतो.अशा स्वरुपाच्या योजना देशात राबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी बी.आर.एस.पक्ष देशातील विविध राज्यात आपला विस्तार करीत आहे.म्हणून आपल्या भागातील नागरिकांनी देखील या पक्षात प्रवेश करावा,असे ही ते म्हणाले.तसेच नांदेड येथे लवकरच तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत नांदेड येथे भारतीय राष्ट्र समीती पक्षाच्या एका भव्य मेळाव्याचे लवकरच आयोजन करण्यात येणार असून पवित्र गुरुद्वाराचे दर्शन घेऊन नांदेड जिल्ह्यातील जनतेशी ते संवाद साधणार आहेत. यानंतर पक्ष विस्तारण जोमाने करण्यात येईल.तरी सदरील मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

तेलंगणा राज्यातील निर्मल येथे स्थायिक झालेले व किनी ता. भोकर येथील रहिवासी असलेले डॉ.नरेशरेड्डी दोडीकिंदवाड, म्हैसा मं.येथील डॉ.मुत्यालवाड,डॉ. मुत्यमरेड्डी यांनी रेड्डी समाज बांधव सन्मान सोहळ्याचे व काही उत्साही राजकीय कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी किनी येथे मंत्री अमोल इंद्रकरण रेड्डी,आमदार गडन्ना विठ्ठल रेड्डी व आदी मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.तसेच आयोजकांनी मंत्री महोदय व उपस्थितांचा यथोचित सत्कार केला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रेड्डी समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला.तर मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत किनीचे रमेश रेड्डी निघावाड,विलास रेड्डी आष्टपवाड, गजेंद्र रेड्डी बक्कासाब, निघा चिनन्ना यांसह अनेक तरुणांनी बि.आर.एस पक्षात प्रवेश केला आहे.परिसरातील अनेक गावच्या नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोहळ्याचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सत्यनारायण रेड्डी कोतुरवाड यांनी केले.

अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तेलंगणाच्या बी.आर.एस.ची एन्ट्री

बी.आर.एस.पक्ष हा काँग्रेस पक्षाचा समविचारी पक्ष असला तरी संपन्न झालेल्या सोहळ्यातून सदरील पक्षाने अनेकांचा पक्ष प्रवेश करुन घेत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात पक्ष विस्ताराचा सुरुंग लावला आहे,असे यावेळी अनेकांतून बोलल्या जात आहे. सदरील सोहळ्यास आ.अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते नरसारेड्डी गोपीलवाड यांसह आदीजण प्रामुख्याने उपस्थित असतांना परिसरातील अनेकांनी बी.आर.एस.पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षास लवकरच भगदाड पडेल काय ? अशी चर्चा होत आहे.तसेच अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तेलंगणाच्या बी.आर.एस.ची एन्ट्री झाल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत या पक्षाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता असून त्या उमेदवारांच्या विजयाने बी.आर.एस.पक्षाचे खाते ही येथून उघडू शकेल,असे ही चर्चील्या जात आहे.त्यामुळे येथील काँग्रेससह विविध राजकीय पक्षांत अस्वस्थता पसरली आहे.

223 Views
बातमी शेअर करा