मुंबई, दि. २१ डिसेंबर
खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून या यात्रेत अडथळे निर्माण करण्याचे काम भाजपाने पहिल्या दिवसापासून केले. भाजपाच्या अपप्रचाराला जनतेने भीक न घालता पदयात्रेला मोठा पाठिंबा दिला. पदयात्रा आता दिल्लीच्या जवळ आल्याने भाजपाला जास्तच धडकी भरली आहे. या भीतीपोटीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पदयात्रेत कोरोना प्रोटोकॉल पाळा अन्यथा पदयात्रा थांबवावी लागेल, असे धमकीचे पत्रच पाठवले आहे पण ही यात्रा कोणीही थांबवू शकत नाही, असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असून पदायात्रेत मास्क घालणे, अंतर ठेवणे, पदयात्रेतील सहभागी लोकांना विलगीकरणात ठेवणे अशा प्रकारचे कोरोनाचे सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे अन्यथा जनहित लक्षात घेऊन ही पदयात्रा थांबवावी लागेल असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देऊन भाजपा व मोदी सरकार भारत जोडो यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाने घाबरले आहे हेच दाखवून दिले. कोरोनाचा आता देशात फारसा प्रभाव राहिलेला नाही, देशभरातील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरु आहेत. नुकत्याच्या पार पडलेल्या गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या, रोड शो केले. यावेळी कोरोनाचे कोणते प्रोटोकॉल पाळले होते? त्यावेळी असे पत्र पाठवण्याची सुबुद्धी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना का झाली नाही?
कोरोनाच्या दुसऱ्या लोटेत देशभरात कोरोनाचे दररोज हजारो रुग्ण आढळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंश्चिम बगाल, पंजाबसह पाच राज्यात झालेल्या निवडणुकीतही अनेक जाहीर सभा घेतल्या त्यावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळला होता? भाजपाच्या सभा व रोड शो अथवा गर्दीचे कार्यक्रम असले की कोरोना पळून जातो का? आणि फक्त विरोधी पक्षांच्या कार्यक्रमातच कोरोना येतो का? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना एवढीच कोरोनाची चिंता असती तर देशात कोरोनाचे लाखो बळी हकनाक गेले नसते. कोरोना काळात झोपा काढलेले मोदी सरकार व आरोग्य मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत. हिम्मत असेल तर आरोग्य मंत्र्यांनी नरेंद्र मोदी व भाजपा नेत्यांना असे धमकीचे पत्र पाठवून दाखवावे.
भारतीय जनता पक्षाने कितीही अडथळे आणले तरी भारत जोडो यात्रा काश्मीरपर्यंत जाणारच व श्रीनगर मध्ये भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकवणार. ही पदयात्रा आता कोणीही रोखू शकणार नाही व भाजपा सरकारने तशी जबरदस्ती केलीच तर जनता त्यांना योग्य धडा शिकवेल हे लक्षात ठेवावे असेही राजहंस म्हणाले.