माहुर ( श.प्रतिनिधी चव्हाण)
तालुक्यातील दुसऱ्या टप्यातील २६ ग्रामपंचायतीचा झालेल्या मतादानाचा निकाल मंगळवार दि.२० रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार किशोर यादव यांच्या देखरेखीखाली नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांच्या उपस्थितीत मतमोजणी करून जाहीर करण्यात आला.त्यात २६ ग्रामपंचायतीपैकी तब्बल १० जागेवर राष्ट्रवादी कॉऺग्रस समर्थक पॅनलने जनतेतून थेट निवडून सरपंच पदाचा बहुमान पटकावला.तर ५ जागेवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे, ८ जागेवर अपक्ष, १ जागी भाजपा,१ जागी शिवसेना शिंदे गट,,व १ गोरसेना या वेगवेगळ्या पक्षाचे व संघटनेचे समर्थक पॅनलचे सरपंच थेट जनतेतून निवडून आले असून,राष्ट्रीय काँग्रेसला भोपळाही फोडता न आल्याने सरपंचपदाची पाटी कोरीच राहिली आहे.फक्त एका ग्रामपंचायत वर भाजपा समर्थक पॅनलचा सरपंच निवडून आल्याने विद्यमान आ.भिमराव केराम व खातेही उघडू न शकलेल्या कॉग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय जाणकारातून व्यक्त केल्या जात आहेत.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या असताना वसरामनाईक तांडा गावाचा निवडणूकीवर बहिष्कार होता.तर राहिलेल्या २६ ग्रामपंचायतीमधील ३ सरपंच हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. एका गावात सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच नव्हता. उर्वरित सरपंच पदाकरीता २२ गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता एकूण ७६ उमेदवार थेट जनतेतून निवडणूक लढवित होते. दिनांक 20 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी १० वाजता पासून तहसील कार्यालयाच्या सभाग्रुहात प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी नंतर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
माहुर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निकालात राष्ट्रवादी नं.१ तर पाठोपाठ अपक्षांचाही वरचष्मा कॉग्रेसला मात्र भोपळा
456 Views