*जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*वाशीम*:दि.16.भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील बुधवारी दहावा दिवस.सकाळी सेलू फाटा येथे मुल्हेर माळेवाडी येथील आदिवासी समूहाने झुल घातलेला नंदी,पिसारा फुललेल्या मोराच्या आकर्षक वेशभूषेतील कलाकृती, संभळ वाद्यांसह नृत्ये सादर केली होती.’आमची माती आमची माणसे’ या पथकाने बहारदार ‘पेरणी नृत्य’ सादर केले. यावेळी उपस्थितांनी आग्रह करताच राहुलजींनी सुद्धा संभळ, ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी आमदार कुणाल रोहिदास पाटील यांच्यातर्फे राहुल गांधी यांना चांदीची तलवार आणि आदिवासी फेटा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी हजारोंचा समुदाय राहुलजींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होता.वाशिमच्या जांबरुन फाट्यावरून सकाळी सहा वाजता यात्रा सुरु झाली आणि दहा वाजता मुंदडा हायस्कुल येथे विश्रांतीसाठी थांबली.तर सायंकाळी चार वाजता मालेगाव जहांगीर येथील बायपास जंक्शन येथून सुरु होऊन मदेशी गावातील भाजी मंडई येथे निवासासाठी थांबली. जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने दुपारी राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्यासह स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. या भेटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक पुनर्बांधणीचे आव्हान,देशाची सद्यस्थिती यावर चर्चा झाल्याचे मेधाताई यांनी सांगितले.
समितीच्या राष्ट्रीय समन्वयक सुनीती सुलभा रघुनाथ यांनी सांगितले कि,देशात जातीधर्माच्या फूट पाडण्याचे काम सुरु आहे.
यामुळे “नफरत छोडो -संविधान बचाओ” ही चळवळ आम्ही महात्मा गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान सुरु केली होती.
आम्ही ही पदयात्रा प्रत्येक जिल्हात ७५ किलोमीटर आणि देशात ५०० जिल्ह्यात काढण्याचा आमचा निर्धार आहे. पण आमचेच मुद्दे घेऊन राहुल नगांधी रस्त्यावर उतरलेत हे पाहिल्यावर आम्हीही या यात्रेला समर्थन दिले आहे.आमची संघटनात्मक शक्ती कमी असली तरी आमचे संविधान वाचवण्याचे ध्येय फार मोठे आहे,असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील आम्बवळी येथील नितीन गणपत नागनुरकर हे भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यातील देगलूर पासून सायकल प्रवास करत आहेत.
अंगावर काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे शर्ट आणि पॅन्ट परिधान करून, पक्षाचा झेंडा हातात घेऊन नितीन सतत प्रवास करत असतात.गेली १८ वर्षे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात पक्षाचा प्रचार करत असतो. सध्या रोज २५ किलोमीटर सायकल चालवून यात्रेचा प्रचार करत आहे. यात्रेसोबत मी काश्मीर पर्यंत जाणार आहे,असे त्यांनी सांगितले.त्र्याहत्तर वर्षाचे डॉ.महेंद्र मोहन हे कोकणातील राजापूर येथून आले आहेत.
‘” वासल्य मंदिर” नावाचा अनाथ आश्रम ते गेली चाळीस वर्षे चालवतात. आम्ही लहानपणी धर्म निरपेक्षता शिकलो,पण आता धर्मात तेढ निर्माण होत आहे.
देशात संविधानाची हत्या होत असताना शांत कसे राहायचे ? संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत, म्हणूनच राहुलजींना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले