*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२4.परतीच्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी कहर केला असून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीतून कसेबसे वाचलेले पीकही उद्धवस्त झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर मोठे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने किमान आतातरी सरसकट भरीव मदत जाहीर करावी,अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
मागील आठवड्याभरात राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने उच्छाद मांडला. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले.
नांदेड व हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचले. काढणीला आलेली पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
ठिकठिकाणावरून शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती येत असून, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत जाहीर करावी,अशी मागणी चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना केली.नांदेड जिल्ह्यातील नुकसानाबाबत ते म्हणाले की, जिल्ह्यातील सोयाबीनसारखे प्रमुख पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.
कापसाची बोंडे पिवळी तर ज्वारी काळी पडली आहे.कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या केळीचेही मोठे नुकसान झाले आहे.खरीप हंगामाच्या सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीचा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
विमा कंपन्यांनी भरपाईची अग्रिम रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा व असंतोष निर्माण झालेला आहे.
या भयावह परिस्थितीची राज्य सरकारने दखल घेऊन तातडीने हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत जाहीर करावी,असेही अशोकरावजी चव्हाण यांनी म्हटले आहे.