*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.23. जिल्यातील मुखेड तालुक्या मधील हुलगंडवाडी येथील पाच जणांनी पित्राचे जेवण करण्यासाठी माहेरी आलेल्या ३२ वर्षीय विधवा महिलेला अनैतिक संबंधाचा राग धरून विवस्त्र मारहाण करणाऱ्या पाच आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत व विविध कलमांसह मुखेड पोलीसात दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार पाचही आरोपींना मुखेड पोलिसांनी १८ तासात अटक केले आहे.
मुखेड शहराजवळील दबडे शिरूर येथील महिला आपल्या माहेरी हुलगंडवाडी येथे पित्राच्या जेवणाच्या कार्यक्रमास आली असता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आरोपी मारोती खांडेकर,परमेश्वर खांडेकर,व्यंकट खांडेकर,नागेश खांडेकर आणि मष्णाजी खांडेकर या ५ जणांनी तिच्या वडिलांच्या घरात घुसून जाब विचारून तू आमच्या नातेवाईक तरुणीचा संसार खराब करत आहेस म्हणुन मारहाण करत तिला घरातून ओढत रस्त्यावर आणले आणि तिच्या अंगावर व डोळ्यात तिखट मिरची पावडर टाकून जातीवाचक शिवीगाळ करून विवस्त्र करत मारहाण केल्याप्रकरणी मुखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कंधारचे उपविभगीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर बोधगिरे,पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे,पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्यासह मुखेड पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आपले चक्र फिरवत तालुक्यातील कमळेवाडी,दबडे शिरूर येथून पाचही आरोपींना १८ तासाच्या आत अटक केले असून आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात हे करीत आहेत.
सदर घटना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी घडली होती पण पीडित महिलेवर दिनांक १७ सप्टेंबर पासून २० सप्टेंबर पर्यंत दवाखान्यात उपचार सुरू होते. पिडीत महिलेला प्रकृतीत सुधारणा होताच मुखेड पोलिस स्टेशन येथे दिनांक २१ सप्टेंबर रोजी महिलेने तक्रार दिली आहे.