नांदेड (जिमाका) दि. 30 :- महिला व बालकाचे आरोग्य सूदृढ करण्यासोबत त्यांच्या पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवुण आणण्याकरिता त्यांच्यामध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने 1 ते 30 सप्टेंबर 2022 “राष्ट्रीय पोषण महिना” साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, विस्तार अधिकारी सुधीर सोनावणे, प्रकल्प बालविकास अधिकारी विजय बोराटे, मिलिंद वाघमारे तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थिती होते. नांदेड जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची दृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले.
राष्ट्रीय पोषण महिना चार प्रमुख संकल्पनेवर आधारित असून यामध्ये महिला व स्वास्थ, बालक आणि शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण देखील महत्वाचे असून लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला व मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ वरील संकल्पनेवर राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. यासाठी पुरक आहाराबाबत जनजागृती निर्माण करणे, खेलो और पढो अंतर्गत खेळण्यांव्दारे शिक्षण देणे खेळण्यांच्या आधारे शिक्षण व खेळण्यातून प्रोत्साहन देण्यासाठी समुदाय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. बालक, गरोदर महिला, स्तनदा माता, व किशोरवयीन मुलींसाठी ॲनिमिया कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.पाणी व्यवस्थापण पावसाचे पाणी साठविणे या विषयांवर गावांतील महिलांना जागृत करणे तसेच अंगणवाडी केंद्रात गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींसाठी योग सत्राचे आयोजन करणे असे या विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी दिली.
000000