नांदेड (जिमाका) दि. 2 :- ई-श्रम कार्डच्या नोंदणीसाठी राज्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम पोर्टलवर जास्तीत-जास्त प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ.सय्यद यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) वर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामूल्य आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 13 लाख 27 हजार 855 एवढे उद्दीष्ट दिलेले आहे. त्यापैकी 3 लाख 10 हजार 167 असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.
नोंदणी कोण करु शकतो
घरकाम करणाऱ्या महिला, रस्त्यावरिल विक्रते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ऑटो चालक, मेकॅनिक, शिलाइ मशीन कामगार, न्हावी कामगार, आशा वर्कर/अंगणवाडी सेविका, सुतारकाम करणार व्यक्ती, पेंटर, प्लंबर कामगार, इलेक्ट्रीशयन, ब्युटी पार्लर, वृत्तपत्र विक्रेते, हॉटेल चालक,प्रिंटींग काम करणारी व्यक्ती, भाजी विक्रेते,बिडी कामगार, सेंट्रींग कामगार, बांधकाम कामगार, पशुपालन करणारे, लहान व सिमांत शेतकरी, मच्छीमार, सॉ-मिल कामगार, मीठ कामगार,विणकर, बचत गठ, फळ विक्रेते, लेबर कामगार, सुरक्षा कर्मी, लोहार, हातगाडा कामगार इत्यादी क्षेत्रातील कामगार ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करु शकतात. या नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सक्रिय मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक) ही आवश्यक कागदपत्रे लागतात. नांदेड जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगारांनी विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत ई श्रम कार्डसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) वर जाऊन ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून लाभ घ्यावा, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ. सययद यांनी केले आहे.
000000