नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हयातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाचे जोडणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी पुढाकार घेऊन National Voters Service Portal (nvsp.in) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच मतदार यादीच्या नोंदीशी आधार क्रमांकाची जोडणी करण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ ( मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ) यांना सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष / सचिव प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हयातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक कायदा अधिनियम, 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडणे आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडुन ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत. आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले.
18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदाराचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आता 1 जानेवारीला 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकास नाव नोंदविता येत होते. परंतु आता निवडणूक आयोगाने यात सुधारणा केली आहे. या सुधारणानुसार दिनांक 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाव्यतिरिक्त त्याच वर्षातील 1 एप्रील, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या दिनांकावर पात्र होणाऱ्या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता येईल. मतदार यादीत यापूर्वीच नाव नोंदविलेल्या मतदारांसाठी त्यांच्या नावाला आधार क्रमांक जोडण्याबाबत पुढील प्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आली.
· दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून नांदेड जिल्हयात सदर कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
· दिनांक 1 एप्रील 2023 पर्यंत मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीनी त्याचा आधार क्रमांक मतदार यादीशी जोडून घ्यावा.
· मतदारांना ऑनलाईन पध्दतीने त्यांचा आधार क्रमांक National Voters Service Portal (nvsp.in) या संकेतस्थळावर, Voter Help App (VHA) या माध्यमावर तसेच बीएलओ यांच्या कडे Garuda App व्दारे जोडता येईल.
· मतदार यादीतील नावाशी आधार जोडणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हयात दिनांक 04 सप्टेबर 2022 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी कशी करावी याबाबतचे प्रात्याक्षिक यावेळी उपस्थित असलेल्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना करून दाखवण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे, नायब तहसिलदार डी. एन. पोटे, महसूल सहा. शरद बोरामने व संगणक चालक विनोद मनवर उपस्थित होते.
000000