नांदेड, (जिमाका) दि. 19 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा” उपक्रमाला लोकसहभागाच्या व्यापक चळवळीचा एक नवा मापदंड आज निश्चित करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद व आत्मिक समाधान घेता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने नियोजनासाठी आज व्यापक बैठक घेतली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उद्योजक, व्यापारी व इतर प्रतिनिधींच्या सहमतीने “हर घर तिरंगा” अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला.
“हर घर तिरंगा” व इतर प्रशाकीय नियोजनाबाबत आज आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, सौम्या शर्मा, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन
जिल्हा परिषद यशस्वी करणार उपक्रम – वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गाव, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांचा सहभाग “हर घर तिरंगा” उपक्रमाला लोकसहभागाचा आदर्श मापदंड निर्माण करून देणारा आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागासाठी स्वयंस्फूर्त तत्पर आहेत. प्रत्येकाचे योगदान यात सर्वात महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेचे 11 हजार 900 कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचारी आपल्या वैयक्तिक घरासह गरजू तीन व्यक्तींना तिरंगा देईल. एकट्या जिल्हा परिषदेमधून जवळपास 50 हजार जिल्ह्यात गरीब, दारिद्रयरेषेखाली व्यक्तींना आपला तिरंगा देईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. देशभक्तीसह देशाप्रती कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असलेल्या प्रत्येक नागरिक, प्रतिनिधी यांचा सहभाग हा व्यापक करण्यासाठी जिल्हा परिषद लवकरच विशेष बैठक घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
दरवर्षी नित्यनेमाने जिल्ह्याच्या काना-कोपऱ्यात असलेल्या वस्ती-तांड्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी हे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रभातफेरी द्वारे राष्ट्रप्रेमाचे स्फूलिंग निर्माण करतात. या मोहिमेसाठी हे विद्यार्थी अमृत महोत्सवी वर्षाच्यादृष्टिने व्यापक जनजागृती करून राष्ट्राप्रती कर्तव्य भावनाही निर्माण करतील. “हर घर तिरंगा”साठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्ह्यातील सर्व शाळा, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी योगदान देतील, असा विश्वास वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेतर्फे लोकसहभागाची स्वतंत्र त्रिसूत्री तयार करीत असून सर्वांचा सन्मानाने सहभाग यासाठी आम्ही विशेष भूमिका बजावू असे त्यांनी स्पष्ट केले.
महानगर आणि नगरपरिषदेच्या सहभागासाठी नियोजन
महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात लोकांचा उर्त्स्फूत सहभाग दिसून येत आहे. लोक “हर घर तिरंगा” साठी पुढे येत आहेत. शहरात राहणाऱ्या नगरिकांची संख्या, एकुण कुटूंब संख्या लक्षात घेऊन तिरंगाचे नियोजन केले जात आहे. यात वितरण हा खूप महत्वाचा भाग असून महानगरपालिकेतर्फे प्रत्येक विभाग निहाय तिरंगा विक्रीचे वितरण केंद्र तयार करू असे मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले. जिल्ह्यात 16 नगरपरिषदा असून या क्षेत्रातील 121 बचतगटांमार्फत सुमारे 79 हजार कुटुंबांपर्यंत तिरंगा पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात 1 हजारापेक्षा अधिक बचतगट आहेत. सर्व बचतगटांना सहभागी करून घेण्याबाबत माविमतर्फे नियोजन केले जात आहे.
0000