KINWATTODAYSNEWS

शासनाचे ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी अडचणीत

किनवट ता.प्र दि ०१ मोठा गाजावाजा करुन ज्वारी या पिकाची खरेदी शासनाने आदिवासी विकास महामंडळा मार्फत सुरु केली तर या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. हेमंत पाटील व आ. भिमराव केराम यांच्या हस्ते झाली त्यामुळे शेतकरी हे त्यांच्या ज्वारी या पिकाला शासनांचा हमीभाव मिळेल या आशेने आनंदीत होते.

       परंतु दोनच दिवसात ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने शेतक-यांच्या आनंदावर विरजन पडले त्यामुळे शेतक-यांचा हिरमोड झाला परंतु आता शेतक-यांच्या घरात ज्वारी चे पिक पडले असुन ते विक्री करुन पुढील पिकाच्या पेरणीच्या विवंचनेत शेतकरी आहेत. कारण बाजारात शेतक-यांच्या ज्वारी या पिकाला १५०० रुपये प्रती क्विंटल असा दर प्राप्त होत तर शासनाचा हमीभाव २६२० रुपये प्रति क्विंटल आहे. अशा प्रकारे शेतक-यांची वारेमाप लूट केली जात आहे. होत असलेल्या या शेतक-यांच्या त्रासाकडे लक्ष देण्यात कोणत्याही लोकप्रतीनिधीकडे वेळ नसल्याने किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातील शेतक-यांमध्ये प्रचंड रोष आहे.

       याबाबत किनवट शहरातील मानकरी शेतकरी मुकुंद नारायणराव नेम्मानिवार यांनी खा.हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु किनवट येथिल ज्वारी खरेदी केंद्र हे महाराष्ट्रात एकमेव केंद्र असल्याने नावलौकीकास आले होते परंतु प्रशासनाच्या उदासिन भुमिकेमुळे शेतक-यांना अतोनात त्रास होत आहे. याकडे कळकळीने लक्ष देण्याची मागणी शेतक-यांकडुन करण्यात येत आहे तर याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड यांना विचारणा केली असता त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगीतले तर प्रहार जनशक्ती पार्टीचे अभय नगराळे यांनी शेतक-यांचे हित जोपासत आत्मदहन करण्याचा इशारा दिला असुन लवकरच त्यासंबधी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी कळवले आहे. तर भाजपा ता. अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी आ.भिमराव केराम हे त्याकरीता पाठपुरावा करत असल्याचे सांगितले आहे. प्रयत्न कोणीही करो श्रेय कोणीही घ्या पण एकदाचे ज्वारी खरेदी केंद्र चालु करा अशी भावना ज्वारी उत्पादक शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

175 Views
बातमी शेअर करा