किनवट प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे टिपू सुलतान बिग्रेडची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत टिपू सुलतान बिग्रेडची गोकुंदा शाखेची स्थापना करण्यात आली. गोकुंदा शाखा प्रमुख पदी जावेद भाई यांची, शाखा उपाध्यक्ष पदी सोहेल भाई यांची आणि युवा शाखा प्रमुख पदो जुनेद भाई यांची निवड करण्यात आली. या बैठकीला टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड (उत्तर) जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, किनवट तालुका अध्यक्ष शेख अजमल, तालुका उपाध्यक्ष जुबेर भाई, आमीर भाई आणि मुनव्वर भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला गोकुंदा येथील टिपू सुलतान बिग्रेडचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की “टिपू सुलतान ब्रिगेड मानव सेवा आणि देश सेवेस समर्पित युवकांचे संघटन आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर आणि प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात टिपू सुलतान ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रात युवकांमध्ये स्वाभिमान जागे करण्यासाठी, जागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मा. शेख सुभान अली सरांनी महापुरुषांचे विचार महाराष्ट्रात, देशात नव्हे तर पाकिस्तानात सुद्धा पोहोचविले. हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
सध्याच्या परिस्थितीत देशात अराजकता, अशांतता पसरविण्याचे आणि समाजा-समाजामध्ये फुट पाडण्याचे घाणेरडे कृत्य जातीयवादी शक्तींकडून केला जात आहे. त्यांचे हे मनसुबे हाणून टाकण्यासाठी सुशिक्षित आणि समजूतदार युवकांनी पुढे आले पाहिजे. आज समाजाला, देशाला चारित्र्यवान, कणखर, समर्पित युवकांची गरज आहे. त्यामुळे युवकांनी आपले शिक्षण, आपले काम करत-करत मानव सेवा आणि देश सेवा सुद्धा केली पाहिजे, महापुरुषांचे विचार आमलात आणले पाहिजे आणि त्यांचा प्रचार-प्रसार सुद्धा केला पाहिजे.”