KINWATTODAYSNEWS

खरीप हंगामासाठी पिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना आदेशित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – बहुजन आघाडी

किनवट (आनंद भालेराव)

किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना या खरीप हंगामासाठी पिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना आदेशित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किसन राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

निवेदनात नमूद केले आहे की या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात झालेली असतानाही तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.मागील वर्षी पीक कर्ज माफीत असलेल्या 20 टक्के शेतकऱ्यांनाही बँकांनी कर्ज दिले नाही.कर्ज माफी झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेले आहेत मात्र वर्षभरा पासून लाँकडाऊनचे कारण सांगून बँकांनी शेतकऱ्याच्या कर्ज फाईली प्रलंबित ठेवून अन्याय करण्याचा प्रकार केलेला आहे. गतवर्षी बँकांनी कर्ज देण्यास हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा उपलब्ध झाला नाही परिणामी गरीब शेतकऱ्यांनी पेरन्याच केल्या नाहीत. नापिकीमुळे त्रस्त असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातही सावकारी उसनवारी करून पेरणी करावी लागली. अशा परिस्थितीत महात्मा फुले कर्ज माफी योजनेत नावे असलेल्या पात्र शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या कागदपत्रांची मागणी करून पीक कर्ज नाकारण्यात आले तर पुणर्गठण केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज दिले नाही. माफीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना बँका पिक कर्ज देत नसल्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.या वर्षीसुद्धा शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट असून खरीप हंगामाची सुरुवात होऊन शेतकरी राजा बी- बियाणे खरेदी करण्यासाठी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र बँकांनी लाँकडाऊनचे कारण सांगून पीक कर्ज वाटपाचे काम अद्याप हाती घेतलेले नसल्यामुळे पैशाअभावी यावर्षीदेखील शेतकऱ्यांना आपली शेती पडीत ठेवण्याची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला असून यावर्षीच्या खरीप हंगामासाठी वेळेत पैसा उपलब्ध व्हावा या हेतूने शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित वाटप करण्याचे बँकांना आदेशित करावे तसेच मागील वर्षी प्रलंबित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किसनराव राठोड अंबाडीकर यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. बँकाकडे प्रलंबित असलेल्या पीक कर्जाच्या फाईली तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन बँकेसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

126 Views
बातमी शेअर करा