*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.28.श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन 2010 मध्ये 79 कोटी रुपयाच्या मूळ आराखड्यास मान्यता दिलेली आहे.यात धार्मिक पर्यटन,सांस्कृतिक पर्यटन,वाहतूक पायाभूत सुविधा, इतर आधारभूत पायाभूत सुविधा विकसीत करण्याचा अंर्तभाव केलेला आहे. याचबरोबर पुरातत्व, जलसंधारण,पाणी पुरवठा,वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून माहूरगड विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्यादृष्टिने लवकरच मंत्रालय पातळीवर एक विशेष बैठक सर्व संबंधित विभाग प्रमुख व सन्माननीय मंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन याला चालना देऊ, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाशा धोंडगे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र माहूरगड विकासाच्या 79 कोटीच्या मूळ आराखड्यास सन 2010 मध्ये मंजूरी देण्यात आली. यात रेणुका माता मंदिर परिसर विकास,दत्त शिखीर परिसर विकास,अनुसया माता मंदिर परिसर विकास,सोना पीरबाबा दर्गा परिसर विकास, शेख फरिद दर्गा यासाठी 13 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले. सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने पांडवलेणी विकास,माहूर किल्ला विकास, जलसंवर्धन प्रकल्प,नैसर्गिक पर्यटन घटक विकास,संग्रहालय विकास, मातृतिर्थ तलाव व परिसर विकास,भानूतीर्थ तलाव व परिसर विकास,भोजंती तलाव, जनदग्नी ऋषीमंदिर आदी बाबींचा समावेश आहे. पायाभूत सुविधांमध्ये बसस्थानक, हेलिपॅड,केबलकार,रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण, पथदिवे-सौरदिवे, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन बाबतचीही कामे होणार आहेत.ही कामे निधीच्या उपलब्धतेप्रमाणे केली जात आहेत.
यातील माहूर टी पॉईट ते रेणुकामाता मंदिर,दत्तशिखर पायथा पर्यंत रस्त्याची सुधारणा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सौरपथदिवे,रेणुकामाता मंदिर करीता एक्सप्रेस फिडर,दत्त शिखर मंदीर करीता एक्सप्रेस फिडर,देवस्थान करीता पाणीपुरवठा योजना अशी कामे पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.बाकी इतर विभागाची कामे प्रलंबित आहेत.
ही कामे युद्धपातळीवर हाती घेण्यासाठी संबंधित विभागाचा निधी उपलब्ध करून घेण्यावर भर देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
सन 2010 चा मंजूर आराखडा व त्याची किंमत लक्षात घेता सन 2017 मध्ये या आराखड्याबाबत पूर्नपडताळणी करून इतर कामांसह 216 कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला. याचे नियोजन लवकरच केले जाईल,असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.
*पुलाची कामे तात्काळ पूर्ण करा*
ग्रामीण भागात रस्ते विकासाची कामे वेगात सुरू आहेत. याचबरोबर ज्या तालुक्यांमधून रेल्वे जाते त्या-त्या ठिकाणी ग्रामीण भागाच्या वाहतूकीसाठी हे मार्ग तात्काळ मान्सूमच्या अगोदर सुरू झाले पाहिजे.
यासाठी संबंधीत विभागाच्या प्रमुखांनी दक्षता घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
यावेळी भोकर,अर्धापूर,मुगट व इतर तालुक्यातील विकास कामाबाबत आढावा घेण्यात आला आहे.