बेललोरी धानोरा_ यंदाच्या हंगामात पिकविलेला मका ज्वारी सध्या शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. शासनाने मका खरेदीसाठी राज्याला 1 मे ते 31 जुनी पर्यंत मुदत दिली होती. मात्र प्रत्यक्ष खरेदी चा मुहूर्त अद्यापही निघालेला नसल्याने नोंदणी करणारे हजारो शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत .बेल्लोरी धानोरा परिसरातील अनेक गावात मक्का व ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यात आले असून उत्पादक शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
या हंगामात मका खरेदीसाठी १८५० रुपये ज्वारी २६२० रूपये ही आधारभूत किंमत आहे. मका खरेदीच्या उद्देशाने शेतकऱ्यांची नाव नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. नांदेड जिल्हातील किनवट तालुक्यात मका ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे.
*मिळालेल्या माहितीनुसार मका खरेदीचे उद्दिष्ट दिल्यानंतर खरेदीच्या अनुषंगाने राज्याच्या वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील खरेदीचा मुहूर्त ठरू शकणार आहे.*
खरीप हंगाम उंबरठ्यापर्यंत आलेला असताना यंदा मक्याची विक्री झालेली नाही.
काही शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीची प्रतीक्षा न करता ११०० ते १४०० दरम्यान मका विक्री केली आहे. वास्तविक शासनाचा हमीभाव १८५० रुपये जाहीर झालेला आहे. खरेदीची अनिश्चितता पाहून शेतकऱ्यांनी मक्याची विक्री करीत हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव केली आहे. तरीही नांदेड जिल्ह्यात नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी मका ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. हे शेतकरी मका खरेदीच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत.मागील महिन्यापासून शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रब्बी हंगाम संपूण खरीप हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरी अद्याप जिल्हा केंद्रांना खरेदी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
यामुळे अद्याप एकाही जिल्ह्यात खरेदी सुरू झालेली नाही. रब्बी हंगामातील इतर पिकांचे उद्दिष्ट निश्चित झाले नसले तरी रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, एकूण तीन लाख क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे. अद्याप खरेदी सुरू झाले नसल्याने शेतकरी अडचणीत असून, खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्वारी मका इत्यादी रब्बी पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासंदर्भात शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा सर्व माल शेतकऱ्याकडे पडून आहे. पावसाळा जवळ आलेला आहे. तसेच खरीप हंगामात शेतकरी वर्गाला आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे *लवकरात लवकर शासनाने खरेदी सुरू करून, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील मका ज्वारी धान्य उत्पादक शेतकरी कर्तार साबळे, संतोष घुगे, सोनपाल साबळे, जयराम तगरे, ईश्वर साबळे, लक्ष्मीकांत डोंगरे, यांनी केली आहे.