*||मिलिंद नामा||*
*-एड.मिलिंद सर्पे, किनवट*
आज अनेक बौद्ध कुटुंबातील पालक हे आपल्या मुलाचे नांव *मिलिंद* हे ठेवतात.यात काही नाविन्य नाही.कारण १९५६ ला महार समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहानाला हाक देत हिंदू धर्माचा त्याग करून समतावादी बौद्ध धम्माचा स्विकार केलेला आहे. *मिलिंद* हे बौद्ध संस्कृतील एक प्रमुख नाव आहे.
माझे वडील हे *मिलिंद* महाविद्यालयात शिकूण गावी किनवट ला परत आल्यांतर माझा जन्म १९६४ साली झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “आदर्श विद्यार्थी हा मिलिंद सारखा घडावा व आदर्श शिक्षक हा भंते नागसेन सारखा असावा”,या उद्दात हेतूने औरंगाबाद येथिल नागसेन वन परिसरात *मिलिंद* महाविद्यालयाची १९५० मध्ये सुरुवात केली होती. याच महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने माझ्या वडिलांनी माझे नाव*मिलिंद*ठेवले असावे,असेच मला वाटते.या सुप्त भावनेतूनच समाजाची फुल ना फुलाची पाकळी एवढी सेवा करण्याची प्रेरणा मला मिळत गेली.
माझे वडील उद्धव सर्पे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० मध्ये औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या *मिलिंद* महाविद्यालयाचे सन १९५०-६० या दशकातील सायंस शाखेचे विद्यार्थी होते.हौसाजी शेरे,आनंदराव ठमके,मारोती मुनेश्वर हे त्यांचे मिलिंद महाविद्यालयाततील तत्कालीन सहकारी व मित्र.
माझा जन्म १९६४ मध्ये झाला.माझ्या वडिलांनी माझे नाव *’मिलिंद’* ठेवले. *मिलिंद* महाविद्यालयातून शिकूण आल्यानंतर माझ्या वडिलांनी शिक्षकाची नोकरी स्विकारली.कोपरा(ता. किनवट)व हाळदा (ता. भोकर) या दोन गावी चार वर्षाची सेवा केल्या नंतर माझ्या वडिलांचे टी.बी.च्या आजाराने आदिलाबादच्या शासकीय रुग्णालयात १९६६ मध्ये निधन झाले.कोपरा येथे शिक्षक असतांना जगताप गुरूजी हे त्यांचे सहकारी होते. जगताप गुरुजींची व माझी तीन-चार वेळेस भेट झाली.यावेळी ते आवर्जून माझ्या वडीलांविशषयीच्या आठवनी काढत. माहूरचे युवा कार्यकर्ते अम्रत जगताप हा त्यांचा मुलगा माझा मित्र आहे. माझे वडील हे १९६६ मध्ये टी.बी.च्या आजाराने मरण पावले.त्यावेळी मी फक्त दोन वर्षाचा होतो. त्यामुळे माझ्या वडिलांचा चेहराही आज मला आठवत नाही.माझा मोठा भाऊ *रत्नाकर* हा माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठा, तर माझी बहीन *छाया* ही माझ्यापेक्षा एक वर्षांनी छोटी असे आम्ही तीघे भाऊ – बहीन होतो.पैकी,*छाया* ही कांही वर्षापूर्वी कालकथित झाली आहे व आई *कौशल्या* ही देखिल १५ वर्षापूर्वी कालकथित झाली आहे.
माझे वडील उद्वव सर्पे हे शालेय जिवनापासूनच चळवळ्या स्वरुपाचे होते.म्हणून की,काय माझ्या रक्तातही त्यांची चळवळीची अनुवांशिकता उतरली असावी,असे मला नेहमीच वाटते.अनेक वर्षे किनवटच्या वास्तव्यात राहीलेले प्रा.प्रताप धन्वे यांचे वडील सोपानराव धन्वे हे १९५६ पुर्वी पासून आदिलाबादला रहात होते. ते दलित समाजात कार्य करत होते.त्या काळी कार्यकर्ता म्हणून त्यांची चांगलीच ओळख किनवट परिसरात निर्माण झालेली होती. त्या काळी त्यांनी *”दवंडी”*नावाचे एक पेपरही चालवले होते.ते आमच्या किनवटच्या दलित वस्तीच्याही संपर्कात होते.माझे वडील व त्यांच्ये सहकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन त्यांनी त्या काळात *’रामायन’* व *’महाभारत’*, ही नाटकेही केली होती.त्याकाळी त्या नाटकांचे प्रयोग आदिलाबादसह अनेक शहरात केले होते. या दोनही नाटकात माझ्या वडिलांनी नायकाची भूमिका केलेली होती.
बौद्ध धम्म व बौद्ध धर्मांतर चळवळीची माहीती किनवट तालुक्यात सर्वप्रथम पांढर कवड्याचे जलपतकर गुरुजी यांच्या मार्फत मिळाली असावी,असे सांगितले जाते.माझे वडील व आर.जे.कांबळे गुरूजी हे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरच्या धर्मांतर कार्यक्रमाला उपस्थित असल्याची आठवन कांबळे गुरुजींनी आम्हाला बोलताना सांगितली. माझ्या वडिलांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यानंतर आमच्या घरी शिजणारे बैलाचे मटन बंद करावयास लावले.त्या नंतर आजपर्यंत ते मटन आमच्या घरी शिजलेले नाही.माझ्या वडीलांचे लवकर लग्न झाले. लवकरच तीन अपत्य झाले व त्याकाळी असाध्य अशा टी.बी.या आजाराने त्यांना गाठल्याने त्यांचे अकाली निधन झाले.आम्हच्या घरी जवळपास २० एकर शेती असूनही नंतरच्या काळात मग आमच्या घराला उतरती कळा लागली.
मी सांगत होतो की,माझ्या वडीलांचे निधन झाले त्यावेळी माझे वय दोन वर्षाचे होत. माझ्या घरी माझी माय, आम्ही तिघे भावंडे, दोन अज्या होत्या. एकीला काळी आजी,तर एकीला गोरी आजी(सरुबाई) असे आम्ही मणत असू.आमच्या बरोबरच नव-याला सोडून आमची चंद्रभागा नावाची अत्याही आमच्या घरीच रहायची.तिचा चंद्रशेखर नावाचा मुलगा व चलित्रा नावाची मुलगीही आमच्या कुटुंबातच रहायची. यामुळे माझ्या माईचे व अत्याचे नेहमीच झगडे व्हायचे.अत्याला वाटायचे की,माझ्या माईने मुलांना सोडून माहेराला निघून जावे. आजीच्या व अत्याच्या जबरदस्तीने नाईलाजाने का होईना मग माझ्या माईला माहेरालाच रहावे लागत असे.
लहाणपणी मी अत्यंत चपळ होतो.लवकरच चालायलाही लागलो असे माझ्याबद्दल घरचे सांगतात. सन १९६६ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कांही महीन्यातच अंदाजे तीन वर्षाचे माझे वय असतांना माझा एक अपघात झाला.या अपघातात माझ्या पाठिचे तीन मनके तुटले. त्यावेळी आम्हच्या घरी कोणीही कर्ता पुरुष नसल्याने मला दवाखान्यात नेण्याचा प्रश्न कदाचित निर्माण झाला नसेल. तसेच याकाळात माझ्या वडिलांच्या निधनाने माझे घरही सावरले नसेल. या अपघातून मी मरता मरता वाचलो,असे घरवाले सांगतात.अपघात झाल्याने मला बाजीवरच रहावे लागले.वयाच्या सहा-सात वर्षापर्यंत मला रांगतच चालावे लागले.१९६९ साली पहील्या वर्गात प्रवेश घेतल्यावर मोठ्या भावाचा आधार घेऊन कसे बसे चालता येऊ लागले. पहिल्या वर्गात प्रवेश घेऊनही मला चालता व बसता येत नसल्याने भावाच्या वर्गातच बसावे लागत असे. यामुळे मला पहील्या वर्गातच दोन वर्षे काढावे लागले.
सन१९७०-८० च्या दशकात बळीराम पाटील महाविद्यालयात प्रा.प्रतापचंद्र धन्वे हे समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. याकाळातच पी.जी.गायकवाड हे पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचारी म्हणून आले.त्यांच्या सोबतच त्यांचा लहान भाऊ *सुरेश गायकवाड* हे ही रहात असत. त्यांनी ही बळीराम पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला.धन्वे व गायकवाड हे दोघेही आमच्या गल्लीतच रहात होते.तेंव्हापासूनच ख-या अर्थाने आमच्या गल्लीत फुले-आंबेडकरी चळवळीला सुरुवात झाली.पुढे चालून प्रा.धन्वे यांच्या मार्गदर्शनाखाली *”दलित पँथर”*ची सुरूवातही जोमात झाली.
मी सहावीत असतांना मला दर रविवारी १० पैसे खाऊसाठि मिळत असे. त्या काळी दलित पँथरचे सभासद होण्यासाठी एक रुपयांची सभासद पावती फाडावी लागत होती. मी १०-१० पैसे जमा करून एक रुपयाची रक्कम साठवली. ते पैसे घेऊन *दलित पँथर*चे सरचिटणीस असलेले *सुरेश गायकवाड* यांच्याकडे गेलो व दलित पँथरचा सदस्य होण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह केला.तेंव्हा ते १८ वर्षाच्या आसपासचे व मी १२ वर्षाचा होतो. होते.माझ्या हातातील चिल्लर पैसे पाहून ते भावनिक झाले व मला म्हणाले,तुझ्या सारख्या कार्यकर्त्यांची समाजाला आज फारच गरज आहे.फुले-आंबेडकरी चळवळीसाठी तु नोकरीही करायला नाही पाहीजे.त्यांचे हे भावनिक वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. मला सांगायला आजही अभिमान वाटतो की,पुढे चालून विशेष प्राविण्यासह चार पदव्या घेऊनही नोकरी साठी कुठे अर्जही केला नाही व प्रयत्न ही केला नाही.अर्थात नोकरी न करण्याचा माझा निर्णय हा चुकीचा होता की,बरोबर होता,हे आपण ठरवा.परंतु,माझा हा निर्णय चूकीचाच होता,असे माझ्या कुटुंबियांना आजपर्यंत सतत वाटत आलेले आहे.
प्रारंभी *दलित पँथर*,पुढे चालून *डावी चळवळ* व परत आता फुले-आंबेडकरी चळवळीत जमेल तसे,जमेल तेवढे काम करीत होतो व आहे. नामांतराच्या चळवळीत १५-१५ दिवसाचे सहा असे एकूण तीन महीन्याचा कारावास मी भोगला आहे.कारावासातून आल्यानंतर दादाराव कयापाक हे दलित पँथरच्या वतीने मला सन्मान पत्र देत.ते सन्मान पत्रे आजही माझ्याकडे सांभाळून ठेवलेले आहेत.नामांतराच्या निमित्ताने राज्यातील अनेक तुरुंगाचा अनूभव मला घेता आला.
सध्या अखिल भारतीय बौद्ध उपासक संघ(AILBO) व “सेक्युलर मुव्हमेंट”, या संघटनेचे काम किनवट तालुक्याचे भूमिपुत्र व सध्या औरंगाबादचे रहीवासी झालेले डॉ. अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत ते करणारच आहे.सध्याच्या बेगडी व पावतीबाज कार्यकर्त्यांच्या काळात माझी कोणाला आठवण नाही झाली तरी मला वाईट वाटणार नाही आणि कुणी दखल घ्यावी म्हणूनही मी फुले -आंबेडकरी चळवळीत काम केलेले नाही.मी जे काम केलेले आहे,जे करत आहे, त्याचे फार मोठे समाधान मला मिळत आलेले आहे.सध्या चळवळीला उतरती कळा लागलेली आहे,तरी देखिल ही चळवळच यशस्वि होईल,असा माझा विश्वास आहे.मला वाटते येत्या काळात *हम होंगे कामयाब* आम्हाला कोणीही रोखु शकणार नाही.
जयभीम.