नांदेड दि. 25 –
औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरुन मनोज शेषराव आव्हाड या मागासवर्गीय मातंग तरुणाचे हातपाय बांधून अमानुषपणे लाठ्या-काठ्यांनी ठेचून जिवे मारल्याची गंभीर व अमानवीय घटना दि. 20 एप्रिल 2022 रोजी घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा-सुव्यवस्था उरलेली दिसत नाही. महाराष्ट्रात आता जंगलराज सुरू झाले आहे का? असा संतप्त सवाल आण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाने उपस्थित करत, या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. सर्व मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्या, या आशयाची मागणी करणारे निवेदन संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री, मा. ग्रहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठवले आहे.
या घटनेची हकीकत अशी की, मनोज शेषराव आव्हाड हा 27 वर्षीय मागासवर्गीय मातंग तरुण औरंगाबाद येथील हडको भागातील एका माजी नगरसेवकाच्या मंगल कार्यालयात कामाला होता. येथील लायटिंग चोरल्याच्या संशयावरुन आठ जणांच्या टोळक्याने 20 एप्रिल 2022 रोजी त्याचे हातपाय बांधून लाठ्या-काठ्यांनी कट रचून बेदम मारहाण केली. मनोज ओरडत होता. पण, त्या नराधमांनी त्याच्यावर कोणतीही दया दाखवली नाही. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून तो तरुणाच्या नातेवाईकांना पाठवला. आरोपींनी त्याचा मृतदेह घाटीत टाकला. निर्दयीपणाचा कळस गाठल्याची ही संपूर्ण घटना आहे. या गुन्हेगाराने केलेले कृत्य आणि त्यांची मानसिकता लक्षात घेता त्यांना कायद्याची आणि पोलीस यंत्रणेची कोणतीही भिती नसल्याचे अधोरेखित होते.
हे कृत्य अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे. निवेदनाद्वारे आण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन, प्रजासत्ताक पार्टी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शासनानेे या घटनेची गंभीर दखल घेऊन सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, अशी मागणी करत, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी सतीश कावडे, प्रा.डॉ. विठ्ठल भंडारे, परमेश्वर बंडेवार, दिगंबर मोरे, एच.पी. कांबळे, गंगाधर कावडे, शिवाजी नुरूंदे, नामदेव कांबळे, नागेश तादलापूरकर, सुनील मोघेकर, आनंद वंजारे, संतोष सूर्यवंशी, सुरेश कांबळे, अॅड. एम.जी. बादलगावकर, अॅड. शिवराज कोळीकर, शंकर शिरसे, इंजि. एस.पी. राके, विठ्ठल घाटे, यादव सूर्यवंशी, शंकर गायकवाड, सर्जेराव वाघमारे, एस.एम. गारे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.