KINWATTODAYSNEWS

बिनबुडाचे आरोप काय करता? पालकमंत्र्यांचे अभिनंदन करा!…आमदार अमरनाथ राजूरकर यांचा विरोधकांना टोला

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.11.पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्याला चांगला निधी मिळत असल्याचे विरोधकांनाही मान्य असल्याचे दिसते आहे.त्यातून नांदेड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत असताना पालकमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप काय करता? विरोधकांनी खरे तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांनी लगावला आहे.

भाजपचे आ.प्रशांत बंब यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.

आ.राजूरकर म्हणाले की,आ.प्रशांत बंब यांनी दिलेल्या तक्रारींसंदर्भात विभागाकडून अगोदरच चौकशी झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण विधीमंडळाच्या गेल्या अधिवेशनात विधानसभेत सांगितले होते.तरीही आ.बंब जाणिवपूर्वक चौकशी होत नसल्याचे रडगाणे गात आहेत. ना. अशोकराव चव्हाण यांनी नांदेडचे पालकमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून भाजपच्या पाच वर्षांच्या काळात जिल्ह्याचा खुंटलेला विकास पुन्हा गतीमान झाला आहे.

त्यांचे प्रयत्न, पुढाकार व पाठपुराव्यामुळे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले असून, नवे प्रकल्पही जाहीर होत आहेत.

स्वतः आ.प्रशांत बंब यांनीही नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळत असल्याची कबुली दिली आहे.मात्र,नांदेडचा हा विकास कदाचित विरोधकांच्या डोळ्यात खुपत असावा.त्यामुळेच जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना नांदेडमध्ये बोलावून महाविकास आघाडी व पालकमंत्र्यांची जाणिवपूर्वक बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.केवळ नांदेडच नव्हे तर आज संपूर्ण महाराष्ट्रात असे वेगवेगळे प्यादे वापरून राज्य सरकारला बदनाम करण्याचे विरोधकांचे कारस्थान आता लपून राहिलेले नाही. आ. प्रशांत बंब यांची विधाने ही त्याच षडयंत्राचा एक भाग असू शकतो.

मात्र,विरोधकांनी कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी जिल्ह्याचा बदलता चेहरामोहरा नांदेडकरांच्या निदर्शनास येत असून,त्यामुळेच मागील अडीच वर्षात प्रत्येक निवडणुकीत नागरिकांनी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाणांना बळ दिले, असे आ.अमरनाथ राजूरकर यांनी सांगितले.

427 Views
बातमी शेअर करा