KINWATTODAYSNEWS

विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्र तात्काळ सुरू करा – एसएफआय ची मागणी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्पर्धा परिक्षा केंद्र तात्काळ विद्यार्थ्यांनसाठी सुरू करावी अशी मागणी दि १७ मार्च रोजी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय ) या विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटीच्या वतीने कुलगुरू डाॅ. उद्धव भोसले यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.अन्यथा दि २५ मार्च पासून विद्यापीठातील प्रशासकीय इमारती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा एसएफआय चे काॅम्रेड पवन जगडमवार यांनी दिले आहे.

विद्यापीठात मागील काही वर्षापासून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते.याचा विद्यापीठ परिसर व विद्यापीठ परिक्षेत्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. या परीक्षा केंद्रातून अध्ययन केलेले अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.मात्र कोव्हीडच्या काळात सदरील मार्गदर्शन केंद्र बंद असल्याने येथील साहित्य व मोठ्या प्रमाणात असणारी पुस्तके धूळ खात पडलेली आहेत.याकडे मात्र विद्यापीठाचे साफ दुर्लक्ष असल्याचे जाणवते.

विद्यापीठासाठी हे मार्गदर्शन केंद्र गौरवाचे ठरत आहे मात्र सध्या विद्यापीठ परिसर व परिक्षेत्रात महाविद्यालय ऑफलाइन पद्धतीने शासनाच्या निर्णयानुसार सुरू होऊन एक महिना उलटला असतानाही विद्यापीठ हे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याबाबत कुठलाही निर्णय घेत नाही.सध्या महाराष्ट्र शासन, केंद्र शासन व इतर विविध प्राधिकरणाच्या विभागात रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित झाले आहेत.

त्या पदाकरिता विद्यापीठ परिसरातील व परिक्षेत्रातील अनेक विद्यार्थी तयारी करत आहेत.यासाठी त्यांना सध्या बाहेरील खाजगी क्लासेसला मोठी फिस देऊन तयारी करावी लागत आहे.अगोदरच कोव्हीड महामारीमुळे समाजाची आर्थिक घडी बिघडलेली असताना विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे.

गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने आपले कर्तव्य व सामाजिक बांधिलकी जपत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी एसएफआय चे काॅम्रेड पवन जगडमवार,मनिषा कांबळे,मदन इंगळे,सुक्तापुरे अमोल आदी विद्यार्थ्यांनी केली आहे.

479 Views
बातमी शेअर करा