हिमायतनगर: येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालया अंतर्गत समाजशास्त्र विभागाच्या वतीन “गौरव स्त्रीत्वाचा: ध्यास समानतेचा” या विषयावर एक दिवसीय महिला कार्यशाळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉ. अरुणा कुलकर्णी संचालिका मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था, हिमायतनगर यांच्या हस्ते झाले. या उद्घाटकीय पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम ह्या होत्या. तर साधन व्यक्ती म्हणून डॉ. अनुराधा पत्की प्राध्यापिका, नाट्यशास्त्र विभाग-सिनेअभिनेत्री यांनी ‘महिला सक्षमीकरण काळाची गरज’ या विषयावर आपले मत व्यक्त करताना आजच्या महिलांना उद्देशून सांगितले की, महिलांनी स्वतःच्या विकासासाठी स्वतःलाच कटिबद्ध राहून प्रयत्न करणे आवश्यक आहे. व दुसऱ्यावर विसंबून न राहता आपली सुरक्षा, आपला रोजगार, आपला आर्थिक विकास, आणि आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाचा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे. असे सांगून आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. या सत्रातील दुसऱ्या साधन व्यक्ती म्हणून असलेल्या डॉ. विद्या पाटील सचिव, मानिनी मराठा महिला मंडळ इनरव्हील क्लब नांदेड यांनी ‘स्त्रियांचे आरोग्य’ या विषयी आपले मनोगत व्यक्त कले त्या म्हणाल्या की, स्त्रियांचं आरोग्य हे केवळ स्वतः पुरत मर्यादित नसून त्यांच आरोग्य हे संपूर्ण परिवाराच आरोग्य असते. म्हणून स्त्रियांनी आहारामध्ये प्रोटीन्स, मिनरल्स, विटामिन्स युक्त न्यूट्रिशन चा उपयोग करून आपल्या परिवारासह स्वतःचं आरोग्य सांभाळलं पाहिजे. या विषयीची महत्त्वाची भूमिका मांडून स्त्रियांच आरोग्य समज- गैरसमज याविषयी चे सखोल प्रबोधन त्यांनी केले. यानंतर या सत्रामध्ये तिसऱ्या साधनव्यक्ती म्हणून प्राचार्या डॉ. प्रतिभा शिराढोणकर रावसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, पाच पिंपरी, बिलोली ह्या होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून ‘महिला व्यक्तिमत्व विकास’ यावर प्रकाश टाकला
_तर या कार्यशाळेच्या दुपारच्या सत्राच्या ही अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ उज्ज्वला सदावर्ते ह्या होत्या तर साधन व्यक्ती म्हणून अर्पणा नेरलकर अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद तथा नगरसेविका, नांदेड यांनी ‘युवती सुरक्षा आणि आजादी का अमृत महोत्सव’ या संदर्भाने आपले मनोगत व्यक्त केले. आणि आजच्या युवतींना स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये स्वतःलाच प्रयत्नशील राहणे कसे गरजेचे आहे. आणि तसेच ज्ञानार्जनासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाची जाणीव ठेवणे हे ही आपले आवश्यक कर्तव्य आहे. कारण देशाची धुरा युवकाचा खांद्यावर असते. म्हणून देशाचा व समाजाचा विचार गरजेचे आहे. असे त्या म्हणाल्या. या सत्रातील दुसऱ्या साधनव्यक्ती कु. सपना भागवत लोकमत सखी मंच, प्रतिनिधी यांनी ‘महिलांचे उद्दातीकरण’ या विषयावर आपले सखोल मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रातील तिसऱ्या साधन व्यक्ती म्हणून असलेल्या प्राध्यापिका जयश्री सुभेदार विवेक वर्धिनी महाविद्यालय, नांदेड यांनी ‘राजकारणातील महिलांचा सहभाग’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दोन्ही सत्राचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी आपल्या ओजपूर्ण वाणीतून प्रकट केले. _सूत्रसंचालन डॉ. शेख शहेनाज यांनी केले. तर आभार डॉ. सविता बोंढारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुंदर असे संयोजन व प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाचे प्रमुख तथा स्टॉफ सेक्रेटरी डॉ. डी.के कदम यांनी केले. तसेच विभाचे दुसरे सहाय्यक प्रा. विश्वनाथ कदम यांनी त्यांना सहकार्य केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचा संपूर्ण स्टॉफ आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. त्याच बरोबर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आपल्या आईसह उपस्थित होत्या. आणि या प्रसंगी गावातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदरील कार्यक्रम हा कोविड-19 विषयी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घेण्यात आला.
हुजपा महाविद्यालयात ‘गौरव स्त्रीत्वाचा: ध्यास समानतेचा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
411 Views