KINWATTODAYSNEWS

” पृथ्वीमोलाचा माणूस स्व.उत्तमरावजी राठोड साहेब “

आज 07 मार्च, या पृथ्वीपुत्राचा पूण्यस्मरण दिवस. साहेबांनी केलेले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, शेतीविषयक, आरोग्यविषयक कार्य समाजमनाच्या मनपटलावर नेहमीच थैमान घालीत असतात. आज स्मृतिशेष साहेबांचे 25 वे पूण्यस्मरण त्यांच्या पावन प्रतिमेस माझे कोटी कोटी विन्रम अभिवादन !

*(C.) : डॉ. वसंत भा.राठोड,किनवट.*
*मो. नं. : 9420315409.*
****************************************
भारत वर्षामध्ये कित्येक राजपुरुष, राजपुत्र जन्माला आले नी गेले. परंतु त्यापैकी बर्‍याच राजपुत्रांनी ऐसो, आराम, चैनी, राजविलासी, जीवन न जगता अहोरात्र समाजाच्या उत्थानाकरीता झटत राहिले. स्वताची,कुटुंबाची तमा न बाळगता पायाला भिंगरी बांधून समाज परिवर्तनासाठी गरगर्रा फिरत राहिले. असाच एक ध्येयवेडा राजनेता, चिरंतन युगपुरुष म्हणजे स्मृतीशेष खा.उत्तमरावजी राठोड साहेब हे होत.
तेलंगणा, विदर्भाच्या सीमेलगत पैनगंगेच्या कुशीत स्थिरावलेल्या मराठवाडय़ातील किनवट तालुक्यात मांडवी या गावी डोंगराळ, गिरीकंदरात त्यांचा जन्म दि. 21 फेब्रुवारी 1930 साली, आई इंदिराबाई व वडील बळीरामजी पाटील यांच्या पोटी वैभवशाली जहागीरदार कुटुंबात झाला.
पाच बांधवापैकी उत्तमराव हे सर्वात थोरले होते. मांडवी या गावी म्हणावी तशी शिक्षणाची सुविधा नव्हती. वडील बळीरामजी पाटील यांनी अमरावतीहून एका शिक्षिकेला बोलावून स्वघरातच 1935 साली शाळा भरविली. पुढील शिक्षणाची मात्र भयंकर आभाळ झाली. देश इंग्रज राजवटीखाली पारतंत्र्यात होता. शिक्षण म्हणजे काय हे झाडी जंगलात, वाडी तांड्यात राहणाऱ्या लोकांना नीटपणे कळालेलेच नव्हते. तत्कालीन परिस्थितीत यवतमाळ,अमरावती, नागपुर शिवाय शिक्षणाची व्यवस्था नव्हती. दुथडी भरलेली पैनगंगा नदी ओलांडून विदर्भात प्रवेश करणे म्हणजे तारेवरील मोठी कसरत होत असे. अशा विदारक स्थितीत कुठल्याही प्रकारच्या वाहनाची सोय नसतांना पोटच्या गोळ्यांना पाटील दाम्पत्यांनी आपल्या मुली सहीत सर्वच मुलांना नागपुरला शिक्षणाची सोय केली.
राठोड साहेबांनी पदवीपर्यंतचे शिक्षण हिस्लाॅप काॅलेज नागपुरला घेऊन पुढे वकीलीची पदवी (एल.एल.बी.) हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठात केली. काही काळ किनवट न्यायालयात वकीली व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळेस किनवट तालुका तत्कालीन आंध्रप्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्य़ात होता. नंतर 1956 साली किनवट तालुक्याचे विलीनीकरण महाराष्ट्रात करून नांदेड जिल्ह्य़ात समाविष्ट करण्यात आले.
किनवट तालुक्यातील पहिल्याच निवडणुकीत ते 1957 साली तालुक्याचे आमदार झाले. सलग तिन वेळेस विधानसभेवर व एक वेळेस विधानपरिषदेत निवडून गेले. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात 1977 साली ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री होते. दोन वेळेस हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. एक अभ्यासू खासदार म्हणून देशाच्या संसदेत लौकिकास पात्र ठरले. पाच वर्ष त्यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC Chairman) अध्यक्षपद सांभाळले. 1952 ते 1997 येवढा प्रदीर्घ काळ त्यांनी राजकारण आणि समाजकारणात घालविला. त्यांच्या पंचेचाळीस वर्षांतील राजकारणाची कारकीर्द खरोखरच दीपस्तंभा सारखी आहे. त्यांनी केलेल्या कार्याचे सिंहावलोकन केले तर आजही डोळे दिपून जातात.
किनवट तालुका शैक्षणिक, आर्थिक, राजकीय ,आरोग्यात्मक दृष्ट्या अतिशय मागास होता . अशा प्रसंगी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रित्या तालुक्यातील विकास कामे हाती घेतली. सत्तरच्या दशकात त्यांनी किनवट शिक्षण संस्था किनवट, या संस्थेची स्थापना करून 1972 साली वडील बळीरामजी पाटील यांच्या नावे महाविद्यालय सुरू केले. बोधडी या मोठ्या बाजार पेठेच्या गावी अंध विद्यालय, औरंगाबाद येथे वसंतराव नाईक महाविद्यालय, जन्मगाव मांडवी येथे मातोश्रीच्या नावे इंदिराबाई राठोड ट्रस्ट , इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा, माहूर या धार्मिक स्थळी पुरातन वस्तुसंग्रहालय, किनवट, माहूर, मांडवी येथे ग्रामीण रुग्णालयाची स्थापना अशा अनेक प्रतिष्ठानाचे ते अध्यक्ष होते, साहेब केवळ किनवट तालुक्याचेच नव्हे तर आधुनिक मराठवाड्याचे भाग्य विधातेच होते. स्व. खासदार उत्तमरावजी राठोड साहेबांचे नाव सुवर्णाक्षरात गिरविले जावेत असे दैदीप्यमान कार्य या जाणत्या राजनेत्याचे आहेत.
आपल्या मतदारसंघाच्या अडी अडचणी, समस्या त्यांनी विधानसभेत, लोकसभेत मांडल्या. आपल्या दमदार व अभ्यासपूर्ण भाषणाने संसद दणाणून सोडत असत. सत्ताधारी, विरोधी सहकारी टाळ्यांच्या गजरात बाके वाजवून त्यांचे स्वागत करीत असत. एक उत्कृष्ठ संसदपटू म्हणून स्व. इंदिरा गांधीच्या हस्ते 1982 साली त्यांना गौरविण्यात आले. ते बहूभाषेचे अभ्यासक होते. इंग्रजी, उर्दू, हिंदी ,तेलगू भाषे बरोबरच अनेक प्रांतीय बोलीभाषा त्यांना अवगत होत्या.
निष्णात वाकपटू, वाचन, लेखन, संगीताची प्रचंड आवड त्यांना होती. त्यांचा चौरंगी अभ्यास असल्या कारणाने रंजल्या गांजल्याची, कष्टक-यांची मने ते लवकर ओळखत असत. ग्रामीण भागातील शेतकरी, दिन दुबळ्यांची त्यांनी जीवनाच्या अंतापर्यंत मनोभावे सेवा केली.
किनवट तालुक्यातील अनेक विकासकामे त्यांच्या कार्याची पावती देतात. अनेक मध्यम व लघु प्रकल्पाची कामे त्यांनी केली. जलधारा, डोंगरगाव, लोणी, नागझरी, मांडवी, शिरपूर, निचपूर, पालाईगुडा अशा अनेक ठिकाणी लघुमध्यम प्रकल्पाची उभारणी करून इथल्या डोंगराळ, मुरमाड, खरबाड, भरकाडी शेती, मातीला सिंचनाखाली आणले.
किनवट तालुक्यात नीटपणे दळण वळणाची साधने नव्हती. कैक मैल लोकांना पैदलच पायपीट करावी लागत असे. हे ध्यानात घेऊन त्यांनी शासन आणि लोकसहभाग श्रमदानातून 1956 ते 1986 च्या दरम्यान आंबाडी , जलधारा, निचपूर, वरचा मारेगाव, मोहपुर, कुपटी, इवळेश्वर या डोंगर, द-या ,कडे कपारी, घाट खणून रस्ते बनविण्याचे काम हाती घेतले. परंतु दुर्दैव असे की या घाट माथ्यावरील रस्ते आजही त्यांच्या आठवणीने आसुसलेले आहेत. आज त्या रस्त्याची दुर्दशा पाहवत नाही. लाखोनी वाहनांची संख्या वाढलेली आहेत, रहदारी वाढून रोज अपघात होत आहेत परंतु येवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतरही या रस्त्यांचे नीटपणे रुंदीकरण ,डांबरीकरण झालेले नाही.
मतदार संघातील माळरान पठारावर राजगड येथे प्रियदर्शिनी विमानतळ बनविले, स्वतः विमानात बसून तेथे विमान उतरविले. नंतरच्या राजनेत्यांनी ती तसदी मात्र घेतली नाही. जीवनाचा अटापिटा करून माहूर येथे वस्तुसंग्रहालय बनविले ,भारतभर फिरून एक एक दुर्मीळ वस्तु, दगडमुर्त्या त्यांनी आणल्या व ते संग्रहालय पुरातत्व खात्याकडे वर्ग केले.
सत्तरच्या दशकामध्ये क्षयरोग (T.B.) हा महाभयंकर रोग होता. रोग्यांना वाळीत टाकल्या जात असे. लोकं जनावरांसारखी पटापट मरत असत. या रोगाची गंभीरता लक्षात घेऊन किनवट येथे सँनिटोरियम हॉस्पीटलची (टी.बी. सेंटर) व्यवस्था केली. स्वगावी मांडवी येथे बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालयाची स्थापना केली. त्याचबरोबर खान अब्दुल गफार खान नेत्र रुग्णालय मांडवी, अशी नानाविध विकासाची डोळस कामे त्यांची अविस्मरणीय आहेत.
मराठवाडा पातळीवर येलधरी ईसापूर धरण उभे करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. औरंगाबाद येथिल उच्च न्यायालयाचे खंडपीठ, औरंगाबाद ते आदिलाबादचे रेल्वे ब्रॉड गेजचे काम करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ब्राॅड गेजचे काम तर झाले परंतु शोकांतिका ही आहे की, ठिक ठिकाणच्या उडाण पुलाचे काम मात्र नंतरच्या धुरिणांनी केले नाही ,ईश्वर त्यांना बळ देवो, तशी ईच्छा शक्ती देवो.
साहेबांनी उभ्या आयुष्यात बेगडी, कामचलाऊ , भ्रष्ट कामे कधी केली नाहीत. मतदार संघातील सुशिक्षित तरुण त्यांच्याकडे नोकरी मागण्या करीता जात असत. त्याप्रसंगी ते तरूणांना म्हणत, *” नोकरी ही मागून मिळत नाही,ती स्वकष्टाने प्राप्त करावी लागते. भरपूर अभ्यास करा, स्पर्धा परीक्षेची तयारी करा,तेही जमत नसेल तर हजारो व्यवसाय आहेत ; एखादे हून्नर जोपासून व्यवसायात उतरा, तेही शक्य नसेल तर आधुनिक पध्दतीने शेती करा. कष्ट करा, कमवते व्हा, आई वडीलांच्या मेहनतीवर फुकट पोसल्या जाऊ नका. हा माझा तुम्हा तरूणांना प्रमाण सल्ला आहे. “* अशा परखड शब्दात ते स्पष्टपणे बोलत असत.
मतदार संघातील अनेक तारांकित प्रश्न ते अभ्यासपूर्ण व पोटतिडकीने विधान भवन, संसद भवनात मांडत आणि विकास कामा करीता ते अहोरात्र झटत असत. कैक वेळेस प्रश्न मार्गी लागले नसेल तर पुनः
बुलंद आवाज ते उठवित असत. कित्येक विकास कामे त्यांनी आपल्या खुबीने खेचून आणली.
विरोधकांना ही लाजवेल असे निखळ, निष्कलंक कार्य त्यांचे होते. निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रतिस्पर्धी उमेदवारास आपल्या गाडीतील पेट्रोल भरून देऊन कडकडून मिट्ठी मारणारा असा हा उमदा राजनेता आज शोधूनही सापडणार नाही. राजकारण करीत असतांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक बाबीकडे त्यांचे विशेष लक्ष होते. प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, पू. ल. देशपांडे, राम शेवाळकर, कुलगुरु शिवाजीराव भोसले, जनार्धन वाघमारे
ईत्यादी दिग्गज साहित्यिकांशी त्यांचा घरोबा होता. बासरीवादक दत्ता चौगुले यांना त्यांनी मांडवी,किनवटला आणले त्यांचा यथेच्छ स्वागत ,सत्कार करून त्यांच्या संगीताचा मनमुराद आनंद घेत असत. ते तुकडोजी महाराजाच्या भजनाचे चाहते होते. गोर बंजारा व गोंड आदिवासी समाजातील लोक कलावंताना त्यांनी 1989 साली मुंबईला नेले व दूरदर्शन वरून थेट कार्यक्रमाचे प्रक्षेपण, प्रसारण केले.
साहेब, गोरबंजारा कलावंताना दिल्लीला नेले. 1981 साली स्व. इंदिरा गांधी यांना बंजारा ( घागरा, कंचुकी, ओढणी, श्रृंगार सहित ) वेशभूषा भेट देऊन परिधान करावयास लावले आणि गोरबंजारा पोशाख किती सुंदर, आकर्षक व कलाकुसर युक्त आहे. या पोशाखाचे महत्त्व अधोरेखित केले. ते स्वत: या लोककलावंता सोबत राष्ट्रपती भवनामध्ये नाचण्या, गाण्यात रममाण झाले. म्हणून आज या किनवट तालुक्याच्या जाणत्या राजाची आठवण येते.
स्व. राठोड साहेबांनी सांगितले आहे की, *” मी माझ्या दृढ निर्धाराने बौध्दिक आणि शारीरिक कार्य, जे काही करता आले ते मी केले आहे. आता त्याचा सांभाळ करणे हे भावी पिढीच्या हाती आहे. “*
अतिशय कठिण काळात त्यांनी किनवट विधानसभा व हिंगोली लोकसभा मतदार संघाचे आमदार, खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या वेळेसची समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती बिकट आणि हालाकीची होती. अन्न, पाणी, शेती विषयक समस्या, दुष्काळ अशा अनेक संकटांना ते सामोरे गेले. त्यातून योग्य मार्ग काढत राहिले. कुणालाही न डगमगता दिल्ली दरबारी समाज हिताचे अनेक प्रश्न मांडत राहिले.
अविश्रांत समाजकार्या करीता झटत राहणे, हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी बाणा होता. हा सुर्यासारखा तेजस्वी माणूस मावळतीकडे झुकतांना आपल्या सामाजिक, शैक्षणिक, बौध्दिक कार्याची जबाबदारी नी वारसा भावी पिढीकडे देण्याची आर्जवी हाक देतो.
स्व. राठोड साहेबांच्या नावाप्रमाणेच उत्तमोत्तम गुण त्यांच्यात होते. त्यांच्या अष्टपैलू गुणांचा एक तरी धागा भावी पिढीने अलगद पकडणे आज काळाची गरज आहे. आता त्यांच्या स्वप्नातील भावी पिढी, ही चाणाक्ष, प्रजावत्सल, समाजहितेशी, जाणकार, मनमिळाऊ, समन्यायी, समतावादी असणे आवश्यक आहे. तरच त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जातील अन्यथा त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर व भ्रमनिरास झाल्या शिवाय राहणार नाही. राना वनात जंगली श्वापदांच्या समवेत वाघा सारखी सिंह गर्जना करणारा समाज आज राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, बौध्दिक, साहित्यिक दृष्ट्या क्षीण होत चालला आहे. अशा अनेक दिवाळखोरीपायी जुनी घराणी, वैभव, संपदा, समृद्धी रसातळाला जात आहेत. म्हणून समाजाला आज ज्ञानाच्या मोजपट्टीची चाचपणी, आत्मपरीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यासारख्या निष्णात जाणत्या राजनेत्याची गरज आहे. महाराष्ट्रातून एकही सदस्य आज देशाच्या सर्वोच्च संसदेत नाही. समाजाचे प्रश्न, समस्या आज कोण पोटतिडकीने मांडणार ?
आजच्या आधुनिक धक्काधक्कीत माणूस माणसापासून दुरावतो आहे. त्याकरीता समाजामध्ये बौध्दिक, साहित्यिक, वैचारिक मानवतेची नांगरणी, वखरणी करून स्नेहाचे, ममतेचे बीजारोपण करणे काळाची गरज आहे. त्या शिवाय माणूसकीचे फळ चाखावयास मिळणारच नाही. माणूसकी हरवून बसलेल्या व्यवस्थेची ,समाजाची विचारसरणी जर उलट्या खोपडीची असेल तर समाज परिवर्तन होणे शक्यच नाही.
आज राजकारण काही मुठभर लोकांच्या हाताचे खेळणे नी बटीक बनले आहे. त्याला त्यांनी धंदा , व्यवसाय नी मनसबदारी बनवलेली आहे. आज आमचे नेते, पुढारी, राजकारणी जी वस्तु ( झाडी, झुडपे, दगड, माती, गिट्टी, डांबर, सिमेंट, रेती, घरे, संडास, रस्ते, भंगार, टिन टप्पर, छप्पर इत्यादी ) हातात येईल, सापडेल ती घेऊन पळ काढत आहेत व आपला खजिना भरीत आहेत. असे निच्च व गलिच्छ पातळीचे राजकारण राठोड साहेबांनी मात्र त्यांच्या जीवन अंतापर्यंत कधीही केले नाही वा होऊ दिले नाही. राजकारणाला घराणेशाहीचा वलय त्यांनी त्यांच्या हयातीपर्यंत कधी लागू दिला नाही.
रक्षण करतेच जर आराम, चैन ,विलासी, मौज मजेत रममाण असतील तर जित्यावर , सामान्यांवर कुणी छळाऊ वृतीने लिंबू, अंडे, मिरची, कौडी भारून फेकण्याची गरजच पडणार नाही. आज स्वतःला नेते म्हणवून घेणारे रात्रंदिवस खाणावळीची शाळा भरवून चंगळ करीत असतील तर सळसळत्या रक्ताचा तरूण भरकटल्या शिवाय राहणार नाही. आज आमचा तरूण मोबाईल, इंटरनेटजीवी, खाद्यजीवी, पिद्यजीवी होऊन व्हाटसॲप शाळेत, इंटरनेट विद्यापीठात शिक्षण घेऊन फेसबुक इंडस्ट्रीत रममाण होतो आहे. एक वेळेस साहेबांचे मित्र नांदेडचे झुंजार पत्रकार सुधाकररावजी डोईफोडे व्याख्याना करीता मांडवीला आले ,राठोड साहेबांच्या आठवणी प्रीत्यर्थ ते म्हणाले, *” हिंगोली लोकसभेला उच्चविद्याविभूषित बॅरिस्टर दर्जाचे प्रतिनिधीत्व त्यांच्या रूपाने मिळाले. आज राजकारणात निर्बुद्ध आणि नालायक लोकांचेच उधाण आले आहे, ज्यांची लायकी ग्रामपंचायत सदस्य होण्याची नाही, असे सुमार दर्जाचे व्यसनी, दुराचारी, लंपट ,भ्रष्टाचारी लोकं जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार झाले आहेत ,हा फारच मोठा विरोधाभास आहे.”* आज राजकारणाला सुशिक्षित, प्रजाहितदक्ष, कायद्याची जाण असणाऱ्या लोकांची, तरुणांची , अभ्यासू नेत्यांची गरज आहे. बुरसटलेल्या मानसिकतेचे कपटी, दुराचारी, व्यसनी, लंपट, नितीभ्रष्ट राजकारणी समाजाला पुढे नेऊ शकत नाहीत. आज या डिजिटल, डाॅल्बी ,इंटरनेट, सॅटेलाईट काळातील कुजक्या,सडक्या राजकारणाला जाती, धर्म, वंश, संप्रदाय, अविचारी पणाला विविध प्रकाराच्या किडी रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे.
साहेबांनी कधी अज्ञानात आनंद मानलं नाही. ज्ञानपिपासू वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नसे. हजारो पुस्तकांच्या गराड्यात ते नेहमीच राहत असत. सुसज्ज ग्रंथालय त्यांनी सजविलेली होती. कला, वाणिज्य, विज्ञान, आरोग्य, तंत्रज्ञान अशा सर्वच ज्ञानशाखांचे चौरंगी ज्ञान त्यांना होते. राजकारणात त्यांनी भावार्थ आणि यथार्थ ज्ञानाची उत्कृष्ठ सांगड घातलेली होती.
या आभाळा ऐवढ्या उतुंग विचाराच्या माणसाच्या ध्येयाने प्रेरीत होऊन माझ्यासारखे कित्येक तरुण विविध क्षेत्रात पोहोचले. मी सुद्धा त्यांच्याच विचाराचा पायीक आहे. त्यांच्या विचाराने भारावून मी मुंबईहून मांडवीला येऊन आज चोवीस वर्षापासून माय मातीत स्थिरावलो नी येथेच ज्ञानाध्यापनात रममाण झालो.
या पृथ्वीमोलाच्या माणसाने आपल्या जगण्याच्या अंतापर्यंत व्यासपीठावर कुलगुरु महोदय जनार्धनजी वाघमारे यांच्या समवेत ज्ञानदानाचच कार्य कराव नी काही क्षणात या जगाचा निरोप घ्यावा ते कधीही परत न येण्यासाठी. ही जीवनाच्या निर्वाणापर्यंत जाण्याची किती अदभुत किमया होती ! असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व दि. 07 मार्च 1997 रोजी चिर निद्रिस्त होऊन काळाच्या पडद्याआड गेले.
या भौतिक जगात आभासी जीवन जगत असतांना कुणीही अमृत पिऊन आलेला नाही. एक दिवस सर्वांनाच आपली जागा रिकामी करावयाची आहे. परंतु जगत असतांना कसे जगावे ते स्व. राठोड साहेबांच्या विचार प्रेरणेतून त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्त्वातून शिकणे आवश्यक आहे. आज 07 मार्च 2022 रोजी, स्वर्गवासी साहेबांचे पंचवीसावे पुण्यस्मरण, त्यांच्या पावन स्मृतीला माझे कोटी कोटी वंदन !

*शब्दांकन : डॉ. वसंत भा.राठोड,किनवट .*
*मो. नं. : 9420315409 .*
***************************************

483 Views
बातमी शेअर करा