हिंगोली/कळमनुरी : मागील ७ वर्षांपासून प्रलंबित असलेला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पाणंद रस्त्याच्या प्रश्नाबाबत ग्रामविकास सरपंच संघटनेच्या वतीने ५० गावच्या सरपंचानी केलेल्या आमरण उपोषणाचा तोडगा खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आला . उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनास दिले आहेत .
तालुक्यात मागील ७ वर्षांपासून पाणंद रस्त्याचे मोजमाप करून पुस्तिका रेकॉर्ड करण्यासाठी आणि तांत्रिक मान्यता देण्यासाठी संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने पाणंद रस्त्याचे काम ठप्प झाले होते . सदरील कामावर रोजगार हमी योजनेतून काम करण्यात आले परंतु मस्टरमध्ये झिरो नोंद करण्यात आली . त्यामुळे कामावर करणाऱ्या मजुरांची मजुरी अद्यापपर्यंत दिली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . याबाबत कळमनुरी तालुक्यातील ग्रामविकास सरपंच संघटनेच्या वतीने ५० गावचे सरपंच पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले होते . खासदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढला व उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात यावा असे निर्देश प्रशासनास दिले आहेत . राज्यशासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मातोश्री पाणंद रस्त्याचे नव्याने प्रस्ताव मागविले असून त्यामध्ये या सर्व कामांचा समावेश करावा आणि तातडीने प्रलंबित रस्त्याचे काम सुरु करावे असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . उपोषणसथळी खासदार हेमंत पाटील यांचे कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक यांनी भेट देऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली . खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर उपोषणावर तोडगा काढल्यामुळे संघटनेच्या वतीने आभार मानले आहेत.यावेळी प.स.गटनेते गोपु पाटील,प.स. सदस्य माधवराव सुरोशे, साहेबराव जाधव, बाळासाहेब पतंगे, गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे, बालाजी देवकर, दिलीप मिरटकर, विलास मस्के, विजय अवचार, रुपेश सोनी, धनंजय उबाळे, अशोक जटाळे, अविनाश मस्के ,केशव गायकवाड,सोमनाथ रणखांब,बाळु गवारे, आदीसह सरपंच व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने सरपंच संघटनेचे उपोषण मागे
385 Views