आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू..
शब्दही आमच्या जीवाचे जीवन, शब्दधन वाटू जनलोका..
वरील वचनातून संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांनी शब्दधनाचे महत्त्व सांगितले आहे. अशा शब्दधनाने श्रीमंत असणारा माणूस म्हणजे प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, निवेदक आणि एक प्रामाणिक शिक्षक रमेश पवार हे आहेत. शाळा हे संस्काराचे केंद्र असून प्रमाणिक, नीतीमान, व्यासंगी शिक्षक उत्तम पिढी घडविण्याचे काम करतात, असे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. संशोधक वृत्तीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा वाढवून,ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून तर ज्ञानी, गुणी, विद्वान शिक्षकाची राष्ट्राला मोठी गरज आहे. राष्ट्राची श्रीमंती ही केवळ त्या राष्ट्राच्या भौगोलिक साधन संपत्तीवरून ठरत नसून त्या राष्ट्रातील मनुष्यबळाच्या कार्यकुशलतेवर ठरत असते. अशी कार्यकुशल पिढी घडविण्याचे प्रामाणिक काम करणारे शिक्षक रमेश पवार सर आज नांदेड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक म्हणजे गुरुगौरव पुरस्काराचे धनी झाले आहेत. गुरुगौरव पुरस्काराच्या यादीत त्यांचे नाव पाहून मनापासून आनंद झाला. शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अहोरात्र काम करणाऱ्या हाडाच्या शिक्षकांची निवड करणार्या सुज्ञ निरीक्षकांच्या चोखंदळ दृष्टीकोनाची प्रचितीही आली.
हल्ली प्रत्येकाला शहराचे मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. शहरात राहून मौजमजेची ड्युटी करण्याकडे अनेकांचा कल आहे. मोठा वशिला लावून शहरात किंवा शहराच्या अगदी जवळ पदस्थापना कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणारी मंडळीची संख्या खूप जास्त आहे, पण आजतागायत शहरापासून खूप दूर,अगदी शे-पाचशे वस्तीच्या गावात ड्युटी करणारे शिक्षक रमेश पवार सर निश्चितच कौतुकास पात्र आहेत. बारावीला उत्तम गुण प्राप्त करून डिएडलाही चांगल्या गुणांनी पास होणारे रमेश पवार सर कुठल्याही वशिल्याविना जिल्हा परिषद सेवेत शिक्षक म्हणून रुजू झाले. एकदा का नोकरी मिळाली, की पुन्हा नव्याने काही शिकावे, संशोधन करावे याकडे फारसा कल नसतो, परंतु रमेश पवार सर मात्र सातत्याने नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी धडपडत असतात. नोकरीत असताना त्यांनी बीए, बीएड आणि परवाच एमएडही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले आहे.त्यांनी मराठी, इंग्रजी, शिक्षणशास्त्र या तीन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहिले पाहिजे, ही मनोभूमिका ठेवणारे रमेश पवार म्हणून तर विद्यार्थीप्रिय आहेत. ते ज्या गावात सेवेला जातात, तेथील तरूण,वयस्कर बालमित्र यांच्याशी लवकरच एकरूप होतात. आपल्या अभिनव कल्पना,सहशालेय उपक्रम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून गावातील लोकांना शाळेचा लळा लावतात. गावाच्या सहकार्य आणि सहभागाशिवाय शाळेची उन्नती नाही, याची जाणीव गावकऱ्यांना करून देतात. त्यांनी गावकर्यांच्या उत्तम सहभागातून शाळेचे रुपडे पालटविले आहे.
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना बसविणे,त्यांची उत्तम तयारी करून घेणे, हा त्यांच्या आवडीचा भाग आहे.म्हणून तर त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, इतर सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड असणाऱ्या रमेश पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये भाषण कौशल्य विकसित केले आहे. त्यांच्या शाळेचे लेझीम पथक जिल्हा पातळीवर चमकले आहे. स्वतः उत्तम निवेदक आणि वक्ता असणाऱ्या रमेश पवार यांनी अनेक विद्यार्थ्यांना भाषणासाठी तयार केले आहे. त्यांनी तयारी करून घेतलेल्या मुलांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर बाजी मारली आहे.राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, राष्ट्रपिता महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर श्रद्धा असणारे पवार सर पुरोगामी विचार नुसता सांगतच नाहीत, तर ते स्वतः पुरोगामी विचाराने जगतात. वरील महामानवांच्या जीवन कार्यावर त्यांनी महाराष्ट्रभर शेकडो व्याख्याने दिली आहेत. ते उत्कृष्ट निवेदक आहेत. त्यांनी साधन व्यक्ती म्हणून अनेक राज्यस्तरीय प्रशिक्षण केले आहेत. महामानवाच्या जीवन चरित्रावर आणि सामाजिक विषयावर त्यांनी वर्तमानपत्र व विविध मासिकांमधून उत्कृष्ट लेखन केले आहे.
सध्या बोरगाव (अा.) ता.लोहा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या रमेश पवार यांनी बोरगावमधील शाळा लोकसहभागातून नावारूपास आणली आहे. ते सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहिशाल व्याख्यान मंडळावर व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. मराठा सेवा संघ या वैचारिक संघटनेत ते अनेक वर्षापासून सक्रिय आहेत. सध्या ते नांदेड जिल्ह्याचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. अशा हरहुन्नरी शिक्षकाला आज नांदेड जिल्हा परिषद एका भव्य दिव्य कार्यक्रमात गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहे. या बद्दल सामाजिक, शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींना याचा मनस्वी आनंद होत आहे.श्री रमेश पवार सरांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा!!
प्रा. संतोष देवराये
लेखक,व्याख्याते तथा
तज्ञ सदस्य
शिक्षण व क्रीडा समिती
जि.प.नांदेड
दुरभाष क्र: ९१५८४४३३३३