नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेडच्या सर्वांगिण विकासामध्ये पायाभूत सुविधांसह कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातही नवी पिढी घडावी यासाठी आपण सारे दक्ष आहोत. येथील मराठवाडा साहित्य परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेसाठी स्वत:च्या कार्यालयांना जी जागा आणि सुविधा आवश्यक होती त्याबाबत मी शब्द दिला होता. आज या दोन्ही कार्यालयाच्या दिलेल्या वचनाच्या पूर्तीचा मला अधिक आनंद असल्याची भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
आज नांदेड येथील स्व. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह संकुल परिसरातील या दोन्ही संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अपर्णा नेरलकर, देविदास फुलारी, डॉ. जगदीश कदम, डॉ. भगवान अंजनीकर, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, निर्मलकुमार सूर्यवंशी, दिगांबर कदम, आशा पैठणे, स्वाती कानेगावकर, गजानन पिंपरखेडे, महेश मोरे, नाथा चितळे, अशोक कुबडे, दत्ता डांगे आदी साहित्यीक उपस्थित होते.
नांदेड महानगराच्या गरजा आता वाढत आहेत. वाढत्या गरजेनुसार भविष्यातील नियोजनही करणे आवश्यक आहे. यादृष्टिकोणातून विचार करून संपूर्ण प्रशासकीय कार्यालये एकाच संकुलात जर राहिले तर जनतेच्यादृष्टिने ते अधिक सोयीचे राहील. यादृष्टिने आपण कौठा येथे सुमारे 100 एकर जागेवर एक स्वतंत्र संकुल लवकरच विकसित करत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. नांदेडला कोणत्याही प्रकारची उणीव राहता कामा नये हा माझा पहिल्यापासूनच आग्रह आहे. त्यादृष्टिने आपण विविध कामांचे नियोजनही करून यातील बरीच विकास कामे पूर्णही करून दाखविले असल्याचे त्यांनी सांगितले.
000000