KINWATTODAYSNEWS

गावठी दारु अड्डयावरच तुफान ठोकमपट्टी ; अनेक अवैध धंदे उघडपणे सुरू

किनवट/प्रतिनिधी— दाभाडी गावाच्या सभोवतालच्या गावात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याला मोठ्या नाल्यावरील गावठी दारु अड्डाच कारणीभूत असून सहायक जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि आरोग्य विभागाने तात्काळ कार्यवाही करुन अड्डा बंद करावा. दारुड्यांचा शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. चो-यांचे प्रमाण वाढले आहे. रविवार (१६ मे) मद्यपींमध्ये ठोकमपट्टी सुद्धा झाली. असे प्रकार वाढल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गरीबांना कोरोनाच्या कायद्याचा धाक दाखऊन घरातच बसविण्यापेक्षा प्रशासनाला ही दारु अड्डे उध्वस्त करता नाही आली तरी स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोरोना सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या काळात तरी कोरोना कायद्याचे उलंघन करणा-या अवैध धंदेवाल्यांना चाप बसेल असे वाटत होते परंतु दुर्दैव असे की, यांच्याच काळात इंजेगावफाट्यावरील मटका, बोधडी बु. परिसरात जुगारअड्डा, दाभाडी ते कोठारी जाणा-या मोठ्या नाल्यावरील गावठीदारुचा मोठा अड्डा अशा अनेक ठिकाणच्या अवैध धंद्यांनी कळस गाठला आहे. या दारु अड्यावर शनिवारपेठ, प्रधानसांगवी, दाभाडी अशा अनेक ठिकाणच्या मद्यपींची मोठी वर्दळ आहे. सभोवतालच्या शेतात चो-या होत आहेत. शेतक-यांच्या नाकीदम आणला आहे. शेतक-यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे ?, पोलीस प्रशासनाकडे जायला गेले तर यांच्या संमतीशिवाय हे अड्डे चालतात का ? तेंव्हा यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे चुकीचेच ठरणार आहे.
रविवारी (१६ मे) याच अड्यावर कांहीजनांमध्ये झोडपाझोडपी झाली. यातून जर कांही अनर्थ झाला असता तर, त्यात जिम्मेदार काणाला धरणार ? असाही सवाल विचारला जात आहे. सहायक जिल्हाधिका-यांनी जसे भर रखरखत्या उन्हात ४०-४० कि.मि.लांबपल्यावर जाऊन कामांची पहाणी केली, तद्वतच विकासकामापेक्षाही कोरोना काळात लोकांचे आरोग्य अबाधित राखणे काळाची गरज समजून या अड्यांवर जाऊन अड्यांचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक व तालुका आरोग्य अधिका-यांना सोबत घेऊन कार्यवाही करावी. मास्क वापरणे, दोनगज दुरीचा अंतर ठेवणे, जमावबंदी, संचारबंदी, गर्दी टाळणे याचे प्रशासनाच्या नाकावर टिचून उलंघन केल्यानंतरही कार्यवाही केली जात नाही. या मतीत अर्थातच सर्व कांही दडलेले दिसत आहे.

372 Views
बातमी शेअर करा