*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:जिल्यातील मुदखेड तालुक्यात काल दि.10 फेबु्रवारी रोजी मुगट येथील 14 जणांना नांदेडचे सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 2 लाख 38 हजार रुपये दंड ठोठावला होता. सोबतच तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली होती.या 14 जणांनी ऍट्रॉसिटी कायद्याचा भंग करत 2018 च्या प्रजासत्ताक दिनी अनुसूचित जातीच्या लोकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर दगडफेक केली होती.
दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या लोकांना दंडातील रक्कमेपैकी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याचे आदेश न्या.बांगर यांनी दिलेले आहेत.
27 जानेवारी 2018 रोजी उत्तम अशोकराव हटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जानेवारी 2018 रोजी जिल्हा परिषद शाळा मुगट येथे सांस्कृतीक कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या अनुसूचित जातीच्या मंडळीची अवमानना करून त्यांच्यावर दगडफेक केली. सोबतच ही मंडळी आपल्या वस्तीकडे गेल्यानंतर त्या वस्तीत जाऊन सुध्दा अनेकांनी दगडफेक केली.याबाबत मुदखेड पोलीसांनी राजेश नंदाजी कल्याणे(22), अमोल बालाजी जाधव (24), दत्ता भगवान कल्याणे (27), गजानन विजयराव कल्याणे (35), अनिल शंकरराव कल्याणे(22), फुलाजी अशोकराव मुंगल(25), रोहित रामराव कल्याणे (21), सतिश रमेश उर्फ बाबूराव कल्याणे (30), राहुल व्यंकटराव कल्याणे (30), ओमकार रामराव कल्याणे (18), उध्दव मुर्ताजी मुंगल (23), बालाजी साहेबराव मुंगल(18), निर्गुण बालाजीराव मुंगल(22), बालाजी आनंदराव कल्याणे (30) अशी 14 अशा जणांविरुध्द गुन्हा नोंदवला आणि त्यांच्याविरुध्द न्यायालयात ऍट्रॉसिटी सत्र खटला दाखल केला.
या सत्र खटल्याचा निकाल 10 फेबु्रवारी 2022 रोजी आला. त्यात न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 14 जणांना ऍट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(1)(आर) साठी तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये रोख दंड. तसेच कलम 3 (1)(एस)साठी तीन वर्ष सक्त मजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड ठोठावला.
भारतीय दंड संहितेच्या कलम 143 सोबत 149 प्रमाणे प्रत्येकाला 6 महिने सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड, कलम 147 सह 149 साठी 6 महिने कैद आणि 2 हजार रुपये रोख दंड,कलम 323 सह 149 साठी 6 महिने कैद आणि 1 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 324 सह 149 साठी 1 वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशा विविध शिक्षा ठोठावल्या.या सर्व शिक्षा आरोपींना सोबत भोगायच्या आहेत.पोलीसांनी दाखल केलेल्या दोषारोपातील मुंबई पोलीस कायद्यातील कलम 135 मध्ये सर्व 14 आरोपींची सुटका करण्यात आली.
या आरोपींना प्रत्येकी 17 हजार रुपये रोख दंड ठोठावण्यात आला. त्याच्या एकूण गुणाकाराची रक्कम 2 लाख 38 हजार रुपये होते.26 जानेवारी 2018 रोजी जखमी झालेल्या अरुण गौतम हटकर,उत्तम हटकर,अमोल ढगे,प्रसेनजित हटकर,अंबादास हटकर,मारोती हटकर,नेहा हटकर,लक्ष्मीबाई हटकर,रेखा हटकर,सतिश कोकरे, सुमेध झिंझाडे या 10 जणांसह इतरही कांही लोक जखमी झाले होते.
न्यायालयाने दिलेल्या निकालात 2 लाख 38 हजार रुपये ही दंडाची रक्कम जमा झाल्यानंतर त्यातील जखमी झालेल्या 10 जणांसह इतरांना प्रत्येकी 10 हजार रुपये रक्कम देण्यात यावी असे आदेश या निकालात केले आहेत.या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली होती.
मुदखेडचे पोलीस अंमलदार अजय साकळे या खटल्यात पैरवी अधिकारी होते.या खटल्याच्या निकालाची एक प्रत नांदेड येथील जिल्हादंडाधिकाऱ्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 365 नुसार पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.