KINWATTODAYSNEWS

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं कोरोनाने निधन;राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त;मान्यवरांचे शोकसंदेश…

किनवट टुडे न्युज/
काँग्रेसचे खासदार राजीव सातव गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचंच वृत्त काँग्रेसकडून देण्यात आलं. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

खासदार राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त

खा, राजीव। यांचे दुःखद निधन झाले ही बातमी मनाला बधिर करून गेली.
             -सूर्यकांता पाटील(माजी केंद्रीय राज्यमंत्री)

ज्याच्या कडून आमच्या खूप अपेक्षा होत्या पण घात झाला ।अत्यंत कमी वयात राष्ट्रीय राजकारणात वावरणारा राजीव आज हयात नाही त्याची आई श्रीमती रजनी सातव आणि मी 1980 साली एकत्र काँग्रेस च्या आमदार झालो त्यावेळी राजीव 9 वर्षाचा होता त्याचे वडील डॉक्टर सातव देखील अकाली गेले सातव परिवारावर कोसळलेल्या हया दुःखात मी आणि माझा परिवार सहभागी आहोत ।राजीव च्या आत्म्यास सदगती मिळो आणि परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवाने द्यावी ।ओम शांती

खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे दुःख अतिशय वेदनादायी.
                      -ना.अशोकराव चव्हाण

काँग्रेस पक्षातील आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे दुःख अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाने एक तरुण व कर्तबगार नेतृत्व गमावले असून कॉंग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. जिल्हा पातळीपासून थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत मोठी झेप घेणाऱ्या या काँग्रेसच्या उमद्या नेत्या बद्दल संपूर्ण देशाला कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी तर ते अभिमान होते. पुढील काळात देश आणि पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित होते, परंतु नियतीला कदाचित हे मान्य नसावे.


एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे. जाण्याचं दु:ख आहे.       -आमदार अमरनाथ राजूरकर.( प्रतोद महाराष्ट्र विधान परिषद)
खासदार राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली असून, आज एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे. जाण्याचं दु:ख आहे. अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली. उच्चशिक्षित, साधं राहणीमान आणि अभासृ वृत्ती अशी राजीव सातव यांची ओळख.अत्यंत सालस ,अत्यंत राजस ,राजबिंडा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या एका मोठ्या राजकीय पक्षाचा युवा कार्यकर्ता,
अशा महामारीत जाणे ही घटना क्लेशदायक आहे .

.मा.राजीव सातव यांचं अशाप्रकारे दुःखद निधन होणं ही एका मतदार संघाची हानी नसून एका युवा पिढीचा दिशादर्शक हरवला आहे .अभ्यासू ,कर्तबगार आणि तितकाच लोकाभिमुख विचार करणारा पारदर्शक नेता, म्हणून माजी खासदार राजीव सातव यांच्याकडे जनता आदराने पाहत होती… अशा उमद्या नेत्यास दुःखद अंतकरणाने पूर्ण श्रद्धांजली.

उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला.
                – खा.प्रतापराव चिखलीकर
खा. राजीव सातव यांच्या निधनाची बातमी कळताच धक्काच बसला . हिंगोली सारख्या मागास भागातून स्वबळावर नेतृत्व उभे करत ते महाराष्ट्रसह दिल्लीतही आपली छाप टाकत काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. राज्यसभेतही त्यांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत उपस्थित केलेली चर्चा लक्षवेधी ठरत होती. ग्रामीण मातीतील माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठीही त्यांची धडपड होती. खा. सातव यांचे नेतृत्व सर्वसामान्यांसाठी एक आधारवड होते. अभ्यासू , संयमी, विश्वासू , मनमिळवू , शहरी आणि ग्रामीन भागाच्या विकसाची जाणीव असणारे तरुण नेतृत्व म्हणूनही खा. सातव यांची ओळख होती. मराठवाड्यातील राजकारणात स्वता:ची वेगळी ओळखही त्यानी निर्माण केली होती. अत्यंत उमेदीच्या काळात कोरोना ने खासदार राजीव सातव यांचा घात केला. खा. राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ देवो.-
-खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

अत्यंत दुख:द घटना आहे! पून्हा एकदा मराठवाडा पोरका झालाय!!!

एक अतिशय नम्र, शालिन व अभ्यासू असे व्यक्तिमत्व म्हणजे ॲड.राजीवजी सातव…
सूर्यकांत रेड्डी ता.अध्यक्ष किनवट काँगेस पार्टी

जि.प.,विधानसभा,लोकसभा व राज्यसभा असा संसदिय प्रवास तर युवक काँग्रेस मध्ये तालुका,जिल्हा,राज्य ते राष्ट्रीय अध्यक्ष व आता अ.भा.काँ.कमेटी मध्ये विविध पदावर व विविध राज्याचे प्रभारी असा संघटमात्मक प्रवास.मराठवाडा या रत्नाला मुकला आहे…भविष्यातील राज्य व देश पातळीवरिल नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते अस्या राजीवजींचे अचानक निधन होणे हे खुपच दु:खदायक आहे.कळमनुरी-हिंगोली-मुंबई ते दिल्ली असा दैदिप्यमान राजकिय व संघटनात्मक प्रवास कायम स्मरणात राहील..भावपूर्ण श्रध्दांजली!

निशब्द.. महाराष्ट्र च नाही तर संपूर्ण भारतातील काँग्रेस कार्यकर्त्या साठी काळा दिवस- -डॉ.निरंजन केशवे
आज माझ्यासाठी व महाराष्ट्र च नाही तर संपूर्ण भारतातील काँग्रेस कार्यकर्त्या साठी काळा दिवस आहे…..
आज देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटविनारे,संसद पटू,राज्यसभेचे खासदार आदरणीय श्री.राजीवजी सातव साहेब आपल्याला सोडून निघुन गेले,आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र च नाही तर आपल्या देशाचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे…
आदरणीय साहेबांना भावपुर्ण श्रध्दांजली

655 Views
बातमी शेअर करा