किनवट (प्रतिनिधी):
दिनांक १फेब्रुवारी रोजी फिरते पथकांनी गस्तीवर असताना अंबाडी बीटमधील अंबाडी रेल्वे स्थानकाजवळ आठ कटसाईज सागवान नग जप्त केले. फिरते पथकाकडून जबरदस्त यशस्वी कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फिरते पथक अंबाडी बीट वनपरिक्षेत्रात दि.१फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना कुजबुजू लागली व अंबाडी रेल्वे स्थानकाजवळ गस्त घालत असताना काही वन तस्कर सागवान कटसाईज लाकूड घेऊन जाताना दिसले. वनखात्याची गाडी पाहताच तस्कर लाकूड टाकून देऊन अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
त्यात ८ कट साईज लाकडाचा समावेश होता ज्याची मोजमाप साईज ०.४४५८ घन मिटर असून त्याची बाजार भावानुसार किंमत ९४०६ रुपये इतकी आहे. फिरते पथकाकडून करण्यात आलेली ही एक जबरदस्त व यशस्वी कारवाई मानली जात आहे.
सदरची कारवाई ही सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाने फिरते पथकाचे वनपाल ए.जी.फड यांनी केली. या कारवाईचा पुढील तपास चालू आहे.