KINWATTODAYSNEWS

शिस्तप्रिय व सुजान नागरिक होण्यास स्काऊट गाईड चळवळीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने

किनवट : प्रामाणिकपणा, पर्यावरणमैत्री, बंधुभाव, प्राणिमात्रांवर प्रेम, दररोज एक सत्कृत्य अशा आदर्श नागरिकत्वाच्या नियमांचा स्काऊटमध्ये समावेश आहे. इतरांसाठी झोकून देऊन कार्य करणारा स्वयंसेवी व देशप्रेमाणे ओतप्रोत भरलेला शिस्तप्रिय व सुजान नागरिक होण्यासाठी स्काऊट गाईड या शैक्षणिक चळवळीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.
येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षण विभाग तथा भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील अप्रशिक्षित शिक्षक-शिक्षिका तसेच प्रशिक्षित कब मास्टर, फ्लॉक लीडर स्काऊटर – गाईडर व उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक -प्राध्यापिका यांच्यासाठी *बिगीनर्स कोर्सचे* आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शालेय जीवनापासून मुलांना स्वयंशिस्त लागणे अत्यावश्यक आहे. म्हणून तालुक्यात शाळा तिथे स्काउट गाईड पथक स्थापन करण्याचा आमचा संकल्प आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ कराड अध्यक्षस्थानी होते. जिल्हा आयुक्त गाईड भागीरथी बच्चेवार, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) मनोज टिळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती तुपेकर, श्रीमती गोरे, मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे, मोहन आडे, स्काऊट कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक परमेश्वर बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेश येरकाडे यांनी स्वागत गीत गाईले. जिल्हा संघटन आयुक्त गाईड शिवकाशी तांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.तर जिल्हा संघटन आयुक्त स्काउट गोविंद केंद्रे यांनी स्काऊट गाईडचा इतिहास, ध्येय, प्रार्थना, झेंडागीत, नियम, चिन्ह, वही, ध्वज, गणवेष व बैज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कनिष्ठ लिपीक कैलास कापवार यांनी बहारदार देशभक्ती गीत सादर केले.

91 Views
बातमी शेअर करा