KINWATTODAYSNEWS

राष्ट्रमाता जिजाऊंचा कणखरबाणा व सावित्रीमाई फुलेंच्या क्रांतीची जाणीव आज करून द्यावी लागेल -प्राचार्या शुभांगीताई ठमके

किनवट : आजच्या स्थितीवर मात करून भवसागर पार करायचा असेल तर आम्हाला क्षणोक्षणी कोणत्याही स्वरूपात समाजाचं कल्याण करावं लागेल. कोरोनाने काम धंदा शाळा सर्व बंद आहे. प्रबोधन सुद्धा बंद आहे. जिथं विचारांचं खाद्य हवं ते सुद्धा बंद आहे. आजच्या पिढीला विचार द्यायचा तर काय करायला हवं ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ” जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. ” म्हणून महानायकांचे संचित घेऊन पुढच्या पिढीला सचेत करावे लागेल. राष्ट्रमाता जिजाऊंचा कणखरबाणा, दोन्ही राजांवर केलेले स्त्रीसन्मानाचे संस्कार व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीची जाणीव आजच्या पिढीला करून द्यावी लागेल. तरच बहुजन समाज टीकाव धरेल. असे प्रतिपादन प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी केले.
येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले विचार मंचच्या वतीने “राष्ट्रमाता जिजाऊ , क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व फातिमा शेख संयुक्त जयंती ” निमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
दुय्यम निबंधक अनिता मस्के अध्यक्षस्थानी होत्या. मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, निवृत्त प्राचार्य राजाराम वाघमारे, मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे, मुख्याध्यापक शेख हैदर हे प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते. सिमा नरवाडे यांनी प्रास्ताविक व सारीका दारमवार यांनी सुत्रसंचालन केले. विद्या पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक शेख हैदर, वंदना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ममता बागेश्वर यांनी कविता सादर केली. यावेळी पत्रकार शकील बडगुजर व गोकुळ भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य सुभाष राऊत, पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकूर, किशोर डांगे, प्रफुल्ल डवरे, नागेश कापकर, भटूलाल साळुंके, संजय सोनवणे आदींसह सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

457 Views
बातमी शेअर करा