सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक निस्पृह व्यक्तिमत्व : संभाजीराव मंडगीकर..
मातंग समाजाच्या परिवर्तन आणि प्रबोधन चळवळीतील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेते नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मंडगी या गावचे रहिवासी संभाजीरावजी मंडगीकर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९३८ साली झाला होता. अत्यंत गरीब गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत जन्मलेले संभाजीराव मंडगीकर हे लहानपणापासूनच एक कुशाग्र बुद्धीमत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपणारे एक निस्पृह कार्यकर्ते म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत राहीले. उपेक्षित आणि सामान्य माणसाच्या भल्यासाठी आणि त्यांच्या चांगुलपणासाठी, त्यांच्या प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी अविरतपणे परिश्रमित राहिलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणून संभाजीराव मंडगीकर काकांची ओळख होती. आपल्या जन्मगावी मंडगी येथील ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून त्यांनी राजकारणात आणि समाजकारणात प्रवेश करून समाजाच्या कल्याणासाठी, प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी रात्रीचा दिवस करून गेली साठ वर्ष अहोरात्र समाजप्रबोधनाच्या लढ्यात ते सहभाग घेत असलेले व्यक्तीमत्त्व म्हणून परिचित होते. संभाजीराव मंडगीकर काका हे निस्पृह, निष्कलंक स्वच्छ चारित्र्य असणारे समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. .
संभाजीराव मंडगीकर हे पुढे ते १९७९ ते १०९१ पर्यंत देगलूर पंचायत समितीचे सदस्य ,उपसभापती म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात त्यांना अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची आवड निर्माण झाली आणि ते साहित्य वाचून समाजातील ज्या वाईट चालीरीती आहेत ते बंद होण्यासाठी प्रबोधनात्मक काव्य लिहायला सुरुवात केले. त्याच काळात तालुक्यातील उपेक्षित गोरगरीब आणि आणि वंचित माणसांना न्याय आणि सन्मान देऊन त्या सामान्य माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा सातत्याने गौरव करत गेले.. सामान्य गोरगरीब आणि उपेक्षित माणसचं आपल्या कामाविषयी आणि कर्तृत्वाविषयी प्रामाणिक असतात असे ते सातत्याने म्हणत असत. सामान्य माणसाच्या प्रेमाविषयी त्यांच्या मनात प्रचंड श्रद्धा होती. सामान्य माणूस गरीब असला तरी तो आपल्या जीवनाविषयी आणि श्रमाविषयी एक रूप आणि प्रामाणिक असतो.अशी त्यांची धारणा होती.
संभाजीराव मंडगीकर काकांनी सामान्य माणसाचं जगणं आणि वागणं अत्यंत जवळून पाहिलं होतं. अशी ही गरीब आणि प्रामाणिक माणसं समाजाला प्रेरक ठरतात आणि समाजाचे ते आदर्श असतात यासाठी समाजातील अशा चांगुलपणा जपणा-या निस्पृह आणि चांगल्या माणसांना आपण जपलं पाहिजे असे ते म्हणत असत.
स्व. मंडगीकर काका यांनी देगलूर, मुखेड,बिलोली,नायगाव, नांदेड, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील काही गावासह नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी दि प्रबोधन मेळावे आणि सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथे जाऊन सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे व समाज बांधणीचे खूप मोठे काम त्यांनी केले होते.
संभाजीराव मंडगीकर काका हे १९९७ साली नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येऊन ते नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही एक वर्ष काम केले होते . ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना नांदेड जिल्ह्यातील अनेक वाडी तांड्यावर खेडेगावात जाऊन सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी अहोरात्र धडपडत राहणारे एक निस्पृह समाजकारणी आणि राजकारणी म्हणून ही त्यांची ची ओळख राहिली आहे.
स्व. संभाजीराव मंडगीकर काका यांचा क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ “लसाकम” या कर्मचाऱ्यांच्या संघटनेवर प्रचंड जीव आणि संघटने विषयी प्रेम आणि आदर होता. ही कर्मचाऱ्यांची संघटना टिकावी, वाढावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करत गेले. त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी अत्यंत निष्ठापूर्वक कर्मचाऱ्यांच्या सोबत त्यांनी मोठे योगदान देत राहिले होते. क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसाकम चे माजी प्रदेशाध्यक्ष आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर सरांवर ते नितांत प्रेम करायचे यांच्या ते नेहमी संपर्कात राहून समाजाच्या अनेक प्रश्नांविषयी ते सातत्याने विचारविनिमय करत राहत असत.
स्व.संभाजीराव मंडगीकर काका यांचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि नांदेड जिल्ह्यातील समाजाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री स्वर्गीय मधुकररावजी घाटे यांना आदर्श मानून मी माझा जीवनाची वाटचाल केली असल्याचे ते अभिमानाने सांगत असायचे. संभाजीराव मंडगीकर काका हे वास्तवदर्शी लेखन करणारे उपेक्षित आणि वंचित समाजाच्या प्रश्नाविषयी कणव असणारे एक प्रतिभासंपन्न लेखक, कवी म्हणून ही त्यांची ओळख होती. त्यांनी आजपर्यंत आई, बापाचे ऋण, स्वातंत्र्याची सत्यस्थिती,शिक्षण, शेतकरी, बेटी बचाव बेटी पढाव, कारगिल युद्ध, सामान्य माणूस गरीब व उपेक्षित माणसाच्या व्यथा वेदना आणि महापुरुषांचे विचार त्यांनी आपल्या साहित्य लेखनातून मांडले आहे. रूढी परंपरा अंधश्रद्धा व वाईट चालीरीती संपुष्टात याव्यात यासाठी त्यांनी शेकडो कविता व प्रबोधन गीतांचे लेखनही केले आहे. कल्पनेचे पंख लावून मला आकाशात भरारी मारता येत नाही असे अण्णा भाऊ म्हणायचे तोच वसा आणि वारसा संभाजीराव मंडगीकर काकांनी सातत्याने आपल्या प्रबोधन गीतातून आणि कवितेच्या माध्यमातून मांडण्यात याचा प्रयत्न केला होता. आजतागायत त्यांचे एकही पुस्तक प्रकाशित नसले तरी साहित्याच्या प्रांतात अत्यंत मोलाचे योगदान आणि साहित्यावर प्रेम करणारा एक समीक्षक, वाचक,लेखक म्हणून त्यांची ओळख होती.अण्णाभाऊंच्या मोठेपणाबद्दल ते एका ठिकाणी ते म्हणतात …..
अण्णा मनात येऊ द्या
अण्णा ध्यानात राहूद्या
लहुची क्रांती ज्योत
तेवत मात्र राहुद्या …
अन्नाची लेखणीही
तलवारीची धार आहे
दलित साहित्यात
पेटलेली आग आहे…
अण्णा तुझा फकीरा
बलदंड शूर होता
भुकेल्या माणसाचा
पोशिंदा तोच होता…
अशा आशयाच्या शेकडो कविताच लेखन संभाजीराव मंडगीकर काकांनी केले आहे.संभाजीराव मंडगीकर यांच्या साहित्य, समाज आणि राजकीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील अनेक संस्था आणि संघटनांनी अनेक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला सलाम केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार,महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भूषण पुरस्कार यासह अनेक मान्यवर पुरस्कारानी त्यांना गौरविण्यात आला होता….
अशा या ध्येयवेड्या समाजाभिमुख व्यक्तीमत्वाचे निधन होणे म्हणजे समाजाची फार मोठी हानी आहे. काकांच्या कार्य आणि कर्तृत्वाला विनम्र अभिवादन…..
आणि
भावपूर्ण श्रद्धांजली…..
*** शोकाकुल ***
● शिवा कांबळे, नांदेड ●