जिवती/प्रतिनिधी: जिवती तालुक्यातील केकेझरी येथील रहिवासी असलेले निसर्गप्रेमी प्रतिष्ठित व्यक्ती स्वर्गीय दादाराव मारोती काकडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,तीन सुना,दोन मुली दोन जावई व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. पहिला मुलगा हा माध्यमिक शिक्षक आहे तर दुसरे दोन मुलं वन विभागात कार्यरत आहेत आणि दोन सुना शिक्षकी पेशात असून एक मुलगी अंगणवाडी सेविका आहे.
माणसातच देव शोधणारे दादाराव काकडे यांना फळझाडांची लागवड करणे व त्यांची जोपासना करून झाडांना आलेली फळे सर्वांना प्रेमाने खाऊ घालणे यात फार आनंद वाटत असे. त्यांची वृक्षारोपणाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या मुलांनी तेरवी निमित्त वृक्षारोपण व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला.त्यांच्या अस्थीची राख गंगेमध्ये विसर्जित न करता शेतामध्ये वृक्षारोपण करूण प्रत्येक झाडांना टाकली व परंपरागत चालीरीतींना फाटा देऊन एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे. वृक्षारोपण करून झाडाचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.
दिवसेंदिवस जंगल कमी होऊन प्रदूषण वाढत आहे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि जंगलातील प्राणी व पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे या विचाराने आपल्यावर आलेले दुःख बाजूला सारून काकडे परिवाराने वडिलांच्या तेरवी निमित्त वृक्षारोपण करून त्यांच्या अस्थीची राख सर्व झाडांना टाकली व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला. त्यांच्या अस्थीची राख सर्व झाडांना दिल्यामुळे त्यांची आठवण ही त्या झाडाच्या माध्यमातून कायमस्वरूपी राहील.
या वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश सचिव अँड.दत्तराज गायकवाड,श्री.महेशभाऊ देवकते उपसभापती पंचायत समिती जिवती, अँड.बी.आर.कलवले, श्री.शेषेराव नामवाड, श्री.घोडजकर साहेब नांदेड,श्री.सुनील जाधव सर,श्री.अंगद गायकवाड सर,श्री.अंगद कुंडगीर साहेब,शाहीर तुकाराम जाधव,बालाजी मोरे व अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.तसेच सायंकाळी जेवणानंतर सामाजिक प्रबोधन करण्याकरिता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार तथा शाहीर बाबुराव गाडेकर भोकर जिल्हा नांदेड व विदर्भाचा बुलंद आवाज शाहीर संभाजी ढगे जिवती यांचा बहारदार संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाला परिसरातील व गावातील महिला,पुरुष आणि बालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.
547 Views