KINWATTODAYSNEWS

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून पाच सदस्यीय समितीची घोषणा

अशोक चव्हाण करणार देशभरातील विधानसभा निवडणूक निकालांची समीक्षा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि. ११ मे २०२१:
देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे.या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद,माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा.ज्योती मणी हे चार सदस्य असतील.देशात नुकत्याच पश्चिम बंगाल,आसाम, तामिळनाडू,केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती.मा. ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल.

या जबाबदारीबद्दल मा. ना.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत.या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू,असे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

232 Views
बातमी शेअर करा