*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.2. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने,आगामी काळात घेण्यात येणाऱ्या पीएचडी पात्रता परीक्षा, या ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात,अन्यथा येत्या 5 जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा अधिसभा सदस्य प्रा. सुरज डामरे यांनी कुलगुरूंना दिला आहे
विद्यापीठ प्रशासनातर्फे पीएचडी परीक्षेबाबत आत्तापर्यंत चार वेळेस तारखा बदलण्यात आलेल्या आहेत.यावरून विद्यापीठ प्रशासन हे परीक्षा घेण्याच्या नियोजनाबाबत कमी पडत आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.परीक्षेसाठी पात्र असलेले विद्यार्थी हे फक्त मराठवाड्या पुरते मर्यादित नसून,महाराष्ट्र राज्य व इतर राज्ये आणि परदेशातील देखील आहेत.सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था लक्षात घेता, वारंवार परीक्षेच्या तारखेत होणारे बदल हे विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण निर्माण करणारे आहेत. सध्या सुरू असलेली कोवीड-19 सदृश्य संभाव्य रोगांची लाट, एस.टी.चा चालू असलेला संप आणि वेळोवेळी परीक्षांच्या तारखा होणारे बदल या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता, ही परीक्षा विद्यार्थी हितासाठी ऑनलाईन पद्धतीने घेणे हेच सोयीचे आणि विद्यार्थी आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे असे प्रा.डामरे यांनी कुलगुरूंना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी अन्यथा विद्यार्थी हित लक्षात घेऊन, येत्या पाच जानेवारी पासून मी स्वतः विद्यापीठासमोर उपोषणास सुरुवात करीन असा इशारा प्रा सुरेश डामरे यांनी कुलगुरूंना दिला आहे.
विशेष म्हणजे रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दि. 31 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या परिपत्रकात, विद्यापीठातर्फे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या अन्य परीक्षा संदर्भात एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात क्रमांक एक नुसार काही परीक्षा ऑफलाईन तर काही परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी सुचित करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी पीएचडी पात्रता परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यापीठास काही हरकत नसावी.
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या संसर्गजन्य रोगांच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ,विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी याकडे लक्षवेधत याच विद्यापीठाच्या अधिसभा सदस्याने दिलेल्या इशा-याकडे विद्यापीठ प्रशासन किती गांभिर्याने पाहाते,यावर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य अवलंबून आहे.