KINWATTODAYSNEWS

राजकीय लाभापेक्षा मराठवाड्याच्या विकासासाठी* *चव्हाण कुटुंबाचे योगदान मोलाचे खासदार हेमंत पाटील

नांदेड:संजीवकुमार गायकवाड

मराठवाड्याच्या विकासासाठी स्व.शंकरराव चव्हाण यांनी सुरुवातीपासून राजकारणाच्या पलिकडे जाऊन एक बांधिलकी जपली.दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या भागात पाणी कसे पोहोचेल याचा ध्यास त्यांनी घेतला.जायकवाडीपासून विष्णुपूरीपर्यंत व इतर धरणांसाठी व पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.

हीच कटिबद्धता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी जपून समतोल विकासासह समतोल राजकारणाचाही चांगला पायंडा पाडल्याचे गौरवोद्गार खासदार हेमंत पाटील यांनी काढले.नांदेडसह परभणी आणि हिंगोलीच्याही विकास कामांना ते कमतरता पडू देणार नाहीत,याची आम्हाला खात्री आहे. हिंगोली व नांदेडमधून वाहणारी पैनगंगा नदी ही जीवनदायिनी असून नदीच्या दोन्ही काठांना जोडणारे मार्ग आणि आवश्यक त्या ठिकाणी पूलांच्या बांधकाम कामाकडे त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे लक्ष वेधले.

कामाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी दक्षता व्यक्त करण्यासमवेतच माझ्या करिअरची सुरुवातही कंत्राटदार म्हणून झाल्याचा उल्लेखही त्यांनी अभिमानाने केला. शासनाचा निधी हा मोठ्या कष्टाने आणावा लागतो. या कष्टाने आणलेल्या निधीची उपयोगिता तेवढीच न्यायपूर्ण करावयाची असेल तर संबंधित कंत्राटदारांनी व संबंधित अधिका-यांनी गुणवत्तेची अधिक दक्षता घेतली पाहिजे. चांगले काम करणारे अधिकारी यांच्या पाठिशी आम्ही सदैव उभे असून अधिका-यांना जर चांगले काम करण्यात कोणी आडकाठी करीत असेल तर त्याची आम्ही गय करणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रारंभी अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रास्ताविक केले.सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे यांनी आभार व्यक्त केले.

456 Views
बातमी शेअर करा