शेख जब्बार तालुका प्रतिनिधी/मुदखेड :- तालुकास्तरीय ग्रामीण भागामध्ये रुग्णसेवेचे अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयाची पहिल्यांदाच राज्य शासनाच्या कायाकल्प पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप फुगारे व अन्य वैद्यकीय अधिकारी, अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाला सुवर्ण फळ मिळाले असल्याचे या पुरस्कार निवडीच्या अनुषंगाने प्रकर्षाने दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील गरजू व गोरगरीब रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय आरोग्य सेवेसाठी सदर ग्रामीण रुग्णालय वरदान ठरल्याचे बोलल्या जात आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागांमध्ये जनतेला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केल्या गेली असून राज्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात जनतेला आरोग्य सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्याचे मूल्यांकन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून एका समितीमार्फत नुकतेच करण्यात आले होते. संबंधित अधिकार्यांंकडून ग्रामीण रुग्णालयाच्या विविध कारभाराची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत परिसराची स्वच्छता, रुग्णालयाची देखबाल, घनकचरा व्यवस्थापन,संसर्ग नियंत्रण, आंतर व बाह्य रुग्णांची काळजी व सेवा सुश्रुषा, प्रसुतीगृह, शस्त्रक्रियागृह, अपघात, बाल संगोपन, गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, लसीकरण व अन्य आरोग्यविषयक सोयीसुविधांची जनजागृती, असंसर्गजन्य रोग व राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण, जीवरक्षक कार्यप्रणाली तसेच औषध विभाग यासह ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा कार्यप्रणालीची सविस्तर चौकशी राज्यस्तरीय आरोग्य विभागाच्या समितीमार्फत करण्यात आली.
मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णसेवेची उत्कृष्ट कार्यप्रणाली लक्षात घेऊन जिल्ह्यातील १५ ग्रामीण रुग्णालयाची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. या अनुषंगाने कायाकल्प योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अभिनंदन पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्याकडून येथील ग्रामीण रुग्णालयात नुकतेच प्राप्त झाले आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाला मिळालेल्या यशाचे श्रेय वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप फुगारे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री लोकनेते ना.अशोकराव चव्हाण, माजी आ.अमिताताई चव्हाण, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा.शिंदे नागेलीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा न.प.गटनेते माधव पा.कदम, जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे, जिल्हा दक्षता अधिकारी डॉ.व्यंकट गुडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.अन्सारी, डॉ.तिवारी यांना दिले.
रुग्णसेवेचे अविरत कार्य करण्यासाठी रुपये १ लाख व प्रशस्तीपत्र देऊन सदर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना शासनामार्फत सन्मानित करण्यात येणार असल्याची बाब पत्रात नमूद करण्यात आली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार १६ सप्टेंबर २०२० रोजी डॉ.दिलीप फुगारे यांनी स्वीकारल्यानंतर रुग्ण सेवेला नवे आयाम देण्याचे कार्य त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतले. त्यानुषंगाने त्यांनी हार्निया, हायड्रोसिल, कोरोना लसीकरण, दंतोपचार व आरोग्यविषयक सोयी-सुविधा अशा आदी बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले.
याकामी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष कदम, डॉ.संजय कदम, डॉ.गायत्री राठोड, डॉ.प्रदीप ओमनवार, डॉ.आशिष तळणीकर, डॉ.स्मिता सावंत, अधिपरिचारिका सुरेखा तरुडे यांनीही परिश्रम घेतले.
कायाकल्प पुरस्कारासाठी या ग्रामीण रुग्णालयाची निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव संजय कोलते, पत्रकार ईश्वर पिन्नलवार, मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष शेख जब्बार, अजगर हुसेन, अतिख अहमद, शेख शमशोद्दीन, सिद्धार्थ चौदंते, कुणाल चौदंते, माधव वाघमारे, जयदीप पवार यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, विविध पक्षाचे प्रतिनिधी यांनी कौतुक केले.
मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयाची पहिल्यांदाच कायाकल्प पुरस्कारासाठी निवड** –वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप फुगारे यांच्या अथक परिश्रमाला मिळाले फळ-
483 Views