*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.20.जिवघेणा हल्ला प्रकरणात हल्ला करणाऱ्याला तीन वर्षाच्या सक्तमजुरीसह दहा हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावत सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या प्रकरणातील फिर्यादी आणि दोन साक्षीदारांना खोटी साक्ष दिली, खोटा पुरावा तयार केला या कारणासाठी तीन महिन्याची साधी कैद आणि प्रत्येकी पाचशे रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.नांदेड न्यायालयात फिर्यादी आणि साक्षीदारांना शिक्षा हा प्रकार बहुधा पहिलाच प्रकार आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.४५६/२०१७ भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७,५०६ आणि ४/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार दाखल झाला होता. या गुन्ह्यात शादुल्ला खान महेबूब खान पठाण यांच्यावर जिवघेणा हल्ला करत शेख मुक्तार उर्फ बाबा शेख पीर साब (३३) याने चाकू हल्ला करुन त्यांच्या पोटात जखम केली होती त्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकला असता.
न्यायालयात हा खटला सत्र खटला क्र.१०६/२०१७ नुसार चालला. या खटल्यात फिर्यादी शादुल्ला खान महेबूब खान पठाण (५०) रा.गंगानगर नांदेड, अख्तर खान ताहेर खान पठाण (५२) रा.पिरबुऱ्हाणनगर,मोहंमद मुखीद मोहंमद यासीन (४५) रा.टायरबोर्ड, देगलूर नाका नांदेड या तिघांनी आपले जबाब देताना ते फिरले होते. या प्रकरणातील साक्षी पुरावे,फिरलेल्या साक्षीदारांची सरकार पक्षाने घेतलेली उलट तपासणी या सर्वांना अनुसरुन न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या प्रकरणातील हल्ला करणारा शेख मुख्तार उर्फ बाबा शेख पीर साब यास भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ नुसार तीन वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये रोख दंड तसेच कलम ५०६ अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड भरला नाही तर त्यासाठी वेगळी शिक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी शादुल्ला खान पठाण, साक्षीदार अख्तर खान पठाण, मोहंमद मुखीद या तिघांना न्यायालयाने नोटीस जारी केली होती. या नुसार सरकारच्या वतीने साक्षीदार असतानाही आपण तिघांनी समजून,सवरुन किंवा बुध्दीपुरस्सर खोटा साक्षीपुरावा दिलेला आहे. किंवा अशा कार्यवाहीत तो खोटा साक्षीपुरावा वापरला जावा असे केले आहे.खोटा साक्षीपुरावा दिल्याबद्दल तुमच्याविरुध्द संक्षिप्त संपरीक्षा करणे न्यायाच्या दृष्टीकोणातून आवश्यक आणि समयोचित आहे अशी न्यायालयाची खात्री झाली आहे.
त्यानंतर न्यायालयातील प्रबंधक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या नोटीसनुसार या प्रकरणातील फिर्यादी आणि दोन साक्षीदार यांना ही नोटीस देण्यात आली असून, या तिघांना आज २० डिसेंबर रोजी आपले स्पष्टीकरण सादर करण्यास संधी देण्यात आली होती.त्यात तुम्हाला तीन महिन्याचा कारावास किंवा पाचशे रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा का देण्यात येऊ नयेत,याचे स्पष्टीकरण मागितले होते.या प्रकरणात आज आरोपी, फिर्यादी आणि दोन साक्षीदार न्यायालयासमक्ष हजर असताना न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावल्या आहेत.त्यात जिवघेणा हल्ला करणारा शेख मुख्तार उर्फ बाबा शेख पीर साब (३३)यास तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड तसेच फिर्यादी शादुल्ला खान पठाण आणि साक्षीदार अख्तर खान पठाण व मोहंमद मुखीद यांना खोटा साक्षीपुरावा दिला म्हणून फौजदार प्रक्रिया संहितेच्या कलम ३४४ (१) प्रमाणे तीन महिन्याची साधी कैद आणि प्रत्येकी पाचशे रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.
न्यायालयातून सुटणारे आरोपी आमचे काय बिघडले असे सार्वजनिकरित्या सांगत असतात. या प्रकरणात न्यायालयाने खोटा साक्षीपुरावा देणाऱ्या फिर्यादी आणि साक्षीदारांना दिलेली ही शिक्षा समाजात नक्कीच चांगला प्रभाव पाडणार आहे असे मत एका ज्येष्ठ विधीज्ञानी व्यक्त केले.
एखादा खटला दाखल झाला आणि त्यातील आरोपीविरुध्द न्यायालयात प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही तर आरोपींना बोलण्यास मिळणारी संधी या शिक्षेमुळे नक्कीच नियंत्रीत होईल.एखाद्या प्रकरणात साक्ष देताना आम्ही सरकार पक्षाचे साक्षीदार आहोत याची जाणीव ठेवूनच साक्षीदारांनी जबानी द्यायची आहे.असा एक संदेश या शिक्षेमुळे प्रभावीपणे समाजापुढे जाईल.ता प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली.
या प्रकरणात पैरवी अधिकाऱ्यांचे काम नांदेड ग्रामिण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार फैयाज सिद्धिकी यांनी पूर्ण केले आहे.