KINWATTODAYSNEWS

नरसी येथे त्वरित राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करा खा. चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री कराड यांना निवेदन

नरसी:प्रतिनिधी/( मारोती सुर्यवंशी)
औरंगाबाद – नांदेड जिल्ह्यातील प्रमुख मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नरसी ता.नायगांव येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा तात्काळ सुरु करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे केली आहे. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ना.डॉ.कराड यांना औरंगाबाद येथे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
नरसी ता.नायगांव (खै) हे नांदेड जिल्ह्याच्या व्यावसायिक व भौगोलिक दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण मध्यवर्ती केंद्रबिंदू असलेले शहर आहे. आर्थिक दळणवळणाच्या माध्यमातून परिसरातील 30 ते 35 गांवातील नागरिकांचा नरसी येथे दररोजचा थेट संबध आहे.
नांदेड – हैद्राबाद महामार्गावरील प्रमुख चौरस्ता असलेल्या नरसी येथील लोकसंख्या पंचवीस हजारांच्या आसपास असून तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नरसीत अद्याप राष्ट्रीयकृत बँकेची एकही शाखा नाही. परिणामी बँकेच्या माध्यमातून मिळणार्‍या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच दैनंदिन अर्थिक व्यवहारासाठी येथील नागरीक, व्यापारी वर्ग, महिला बचत गट, शालेय विद्यार्थी यांना पायपीट करुन तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही करुन नरसी येथे शक्य तितक्या लवकर राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करावी अशी आग्रही मागणी श्रावण पाटील भिलवंडे यांनी केली आहे.

52 Views
बातमी शेअर करा