किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुका आदिवासी, बंजारा बहुल असलेला इतर सर्व जाती धर्मीय लोक गुण्यागोविंदाने अनेक वर्षाची परंपरा टिकून वास्तव्यात आहेत. येथील नागरिक आपल्या स्व:कष्टातून जे मिळेल त्यासाठी समाधानी असलेले आपणाला आतापर्यंत पाहायला मिळालेले आहे. परंतु अलीकडच्या काळात किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात मटका,जुगार, अवैध दारू अड्डे, अवैद्य लाकूड तस्करी,अवैद्य गुटखा तस्करी व इतर गोरखधंदे धंदे राजरोसपणे जोमात सुरू आहेत.
यास कोणाचा आशीर्वाद म्हणावा?देव जाणे परंतु सध्या लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या पर्यंत मटका,जुगार खेळला जात आहे. किनवट शहरातील अगदी छोट्या गल्लीपासून तर तेलंगणाच्या बॉर्डर पर्यंत, विदर्भाच्या बॉर्डर, पर्यंत मराठवाड्याच्या बॉर्डर, पर्यंत अगदी जोमात सर्व काही सुरू असताना पोलिसांना हे सर्व कसे दिसत नाही ? या ठिकाणी च्या लोकप्रतिनिधीं ही या गोष्टीपासून कसे अनभिज्ञ राहू शकतात? तालुका प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला ही या याकडे बघण्यास वेळ नाही? की काय बाब आहे? त्यामुळे खुलेआम आकडेमोड सुरू आहे. किनवट चा आज पर्यंत न झालेला विकास या खेळात झालेला दिसून येतो. लोकांची संसार उध्वस्त होत आहेत. लहान मुलं व स्त्रिया आपल्या जुगार खोर व मटका खोर पालका बाबत कुणाकडे दाद मागावी? या विवंचनेत आहेत. मटका,दारूपायी किनवट तालुक्यातील जनतेचे बेहाल तर पोलीस व इतर मालामाल होत असतील काय? असा सवाल मटका,दारू ग्रस्त महिला,मुलं विचारत आहेत.
वरील फोटो घोटी येथे जुगार मटक्याचा आहे.घोटी हे गाव किनवट पासून अवघ्या 5 किमी अंतरावर नॅशनल हायवेवर आहे. यामुळे हजारो संसार उद्धवस्त होत आहेत हे पोलिसांना माहिती नाही का? पोलिस प्रशासनाचे दुर्लक्षामुळे अनेकांची घरे उघड्यावर पडलेली आहेत याकडे कोणालाही बघायला वेळ कसा मिळत नाही? असा यक्षप्रश्न स्त्रियांना भेडसावत आहे.
सर्व तालुक्यातील महिला,मुलांनी ज्यांच्या घरचं वाटोळे झालेलं आहे त्यांनी सर्वांनी येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या व विधानसभा व लोकसभा निवडणुकीतून राजकीय पक्षाचे पुढारी व नेते तसेच लोकप्रतिनिधी यांना आपली जागा दाखवून द्यावी लागणार! अशी प्रतिक्रिया जनसामान्य ऐकवत आहेत .
दिवाळीच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गोपीकिशन मंगल कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना किनवट तालुक्यातील गुटका, मटका, अवैध दारू व इतर तस्करी बद्दल सर्व पत्रकारांना संबोधून प्रश्न विचारला की एवढा सर्व कांही सुरू असतानाही तुम्ही गप्प का? तुम्ही कोणालाही न भिता सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आपली लेखणी झिजवुन गरिबांना न्याय द्यावा असे प्रतिपादन केले होते.
महाराष्ट्र पोलीस अनेक मोठमोठे गुन्ह्यांना सामोरे आणण्यात त्यांचा मोठा हातखंडा राहिलेला आहे. महाराष्ट्र पोलीस चे नाव संपूर्ण जगामध्ये उत्कृष्ट पोलीस म्हणून गाजत आहे. महाराष्ट्र पोलीसाचे प्रत्येक बारीक- सारीक गोष्टीकडे लक्ष असते. मोठा गुन्हा असो की छोटा प्रत्येक ठिकाणी पोलिस तातडीने पोहोचत असते आणि त्या गुन्ह्याचा शोध लावत असते परंतु किनवट तालुक्यात राजरोसपणे चालत असलेल्या या मोठ्या गुन्ह्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
शेवटी, थोड्या पैशाच्या आमिषा पाई अनेक- अनेक निरपराध व गरीब लोकांची घरे,लेकरे उद्ध्वस्त होत आहेत.उघड्यावर पडत आहे.तालुक्यातील सुजाण नागरिकांनी एकत्रित येऊन हे थांबवणे अगदी गरजेचे आहे. तसेच आपलेही मुलबाळ यात गुंतले तर नाहीत ना? याची खातरजमा करुन घेणे ही गरजेचे आहे.