KINWATTODAYSNEWS

एसटी आंदोलनाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका; एसटी लवकर सुरू करावी – विद्यार्थ्यांची शासनाकडे मागणी.

किनवट (प्रतिनिधी)
मागील ३० दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पोहोचवण्याचे काम करीत असलेल्या एसटी ही बंद असल्यामुळे शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. एसटी कामगारांच्या मागण्या मान्य करून एसटी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी शासनाकडे केली आहे.
मुख्यालयापासून दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किनवट या आदिवासी तालुक्यामध्ये एसटी ही जनतेची जीवनवाहिनी असून तालुक्यातील डोंगराळ भागात वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे बहुतेक जनता ही एसटीने प्रवास करीत असते. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा या मुद्द्याला धरून एसटी कर्मचाऱ्यांनी मागील तीस दिवसापासून पुकारलेल्या आंदोलनामुळे एसटी बंद आहे. आता शाळा चालू झाली असून शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. किनवट आगारातून मानव विकास अंतर्गत सात बसेस सोडण्यात येतात. ह्या बसेस तालुक्यातील जवळपास ५० खेड्यातून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचे काम करीत असते. यातून दररोज अंदाजे पंधराशे ते दोन हजार विद्यार्थी प्रवास करतात.आता एसटी बंद असल्यामुळे त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून यात विद्यार्थ्यांची कोंडी होत असताना दिसून येते, तसेच खाजगी वाहनातून प्रवास करीत असताना विद्यार्थिनींना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एसटी आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून एसटी कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनाने मान्य करून लवकरात लवकर एसटी सुरू करावी अशी मागणी आता विद्यार्थी करीत आहेत.

66 Views
बातमी शेअर करा