KINWATTODAYSNEWS

महाराष्ट्रातील 35 जिल्हा मधून सायकल वर भ्रमंती करून पर्यावरण जागृती करण्याचा वसा घेतलेली सिंहकन्या प्रणाली चिकटे नांदेड संस्कार भारती व निसर्ग मित्र मंडळ यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखती मधून प्रणालीचा थरारक प्रवास उलगडला

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:24.समाज विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे ही युवती पर्यावरण जागृती करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांचा प्रवास करून नुकतीच ती नांदेड जिल्ह्यामध्ये आली होती. संस्कार भारती नांदेड शाखा व निसर्ग मित्र मंडळ यांच्या वतीने तिच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी संस्कार भारती देवगिरी प्रांतमंत्री डॉ.अरविंदराव देशमुख, जिल्हा प्रमुख जयंत वाकोडकर, नांदेड समिती अध्यक्ष दिगंबर देशमुख,सचिव डॉ. प्रमोद देशपांडे, सहसचिव राजीव देशपांडे,सौ. विजया कोदंडे,सौ. राधिका वाळवेकर,सौ.मंजुषा देशपांडे.चैतन्य पिंपळडोहकर , निसर्ग मित्र मंडळ चे उपाध्यक्ष उमेश पांचाळ, दिव्य लोकप्रभा चे प्रतिनिधी पत्रकार संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.संस्कार भारतीच्या गीताने या प्रकट मुलाखतीचा प्रारंभ करण्यात आला.संस्कार भारतीच्या वतीने प्रणालीचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित संस्कार भारती व निसर्ग मित्र मंडळ यांच्या सदस्यांशी,शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रणालीने आपल्या ध्येयवादी सायकलिंग प्रवासाविषयी अनुभव प्रकट केले. 20 ऑक्टोबर 2020 रोजी तिने महाराष्ट्र भ्रमंतीला सुरुवात केलेली आहे. प्रणालीचे आई-वडील कोरडवाहू शेतकरी असून आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. तिला तीन बहिणीही आहेत.तिने वर्ध्याला समाज कार्य अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने आईवडिलांची संमती घेऊन पर्यावरण जागृती करण्यासाठी सायकल वर एकटीच भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कोणत्याही संस्थेने तिला प्रायोजित केलेले नाही किंवा आर्थिक मदत देऊ केली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यावरण प्रेमी संस्था व व्यक्तिगत परिचयाच्या व्यक्तींच्या सहकार्याने तिने पस्तीस जिल्ह्यांच्या प्रवासाचा टप्पा नुकताच पार केलेला आहे.प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यातील वणी गावची रहिवासी असून या युवतीने करोणाच्या महाभयानक प्रलयंकारी काळामध्ये आलेल्या अनुभवानंतर व अनेक शेतीविषयक,आर्थिक प्रश्नांनी तिला अस्वस्थ केले होते. या प्रश्‍नांचा उकलसंच शोधण्यासाठी व शेतीतील प्रश्न व होणारे कमी उत्पादन यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे संकटात सापडलेली असून त्याचा परिणाम शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.हे अनुभवण्यासाठी तिने हा प्रवास केला आहे. तसेच शिक्षणाचीही झालेली दुरावस्था व शेतीचे प्रश्न समजून घेत असताना पर्यावरण विषयक प्रश्नांची तिला ओळख झाली. व त्यातूनच तिला पर्यावरण संवर्धन व जागृती, प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र भ्रमंती करण्याची जिद्द निर्माण झाली. करोना च्या काळामध्ये घरोघरी पेपर वाटप करून तिने स्वतःच्या कष्टावर एक सायकल विकत घेऊन सायकलवर प्रवास सुरू केलेला आहे.

ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न तसेच मराठवाड्यातील दैन्यावस्था यामुळे तिचे मन अस्वस्थ झाल्याचेही तिने सांगितले.बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांच्या नऊ हजारांहून अधिक महिलांनी काढून टाकलेल्या गर्भाशयाच्या गंभीर प्रश्नाविषयी तिने खेद प्रकट केला.पालकांनी आपल्या मुलींना अवतीभोवतीच्या चौकटीतून बाहेर पडू दिले पाहिजे.चूल आणि मूल या पलीकडेही जग असते हे पाहण्याची दृष्टी दिली पाहिजे.असे मत प्रकट केले.

पर्यावरण संवर्धन,शाश्वत विकास,कुटुंबामध्ये महिलांना आर्थिक निर्णय घेण्याची भेटलेली मुभा याविषयी तिने उपस्थित महिलांशी संवाद साधला.

प्रवासादरम्यान नागपूर जिल्ह्यातील रामटेक मध्ये एका अशिक्षित माणसाने दाखविलेल्या माणूसकी विषयी ती बोलताना म्हणाले की शिक्षणाने माणूस माणुसकी विसरत चालला आहे.त्यामुळे माणूस बनण्याचे शिक्षण
शिक्षणसंस्थांमधून विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे.

प्रवासादरम्यान तिने ग्रामीण भागातील महिलांशी संवाद साधून त्यांना पर्यावरणाविषयी जागृती, तसेच पर्यावरणात होणाऱ्या बदलांविषयी माहिती करून दिली.या प्रवासामध्ये तिने 399 दिवसांमध्ये एकही दिवस बिसलरी बाटलीतून पिण्याचे पाणी ग्रहण केलेले नाही.तसेच सर्व वस्तू पर्यावरण पुरक वापरलेल्या आहेत. कुठेही प्लास्टिक व पर्यावरणाची हानी करणाऱ्या वस्तू तिने वापरलेल्या नाहीत हे तिने गौरवाने सांगितले. शेतकऱ्यांनी,शेतकऱ्यांच्या मुलांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे.तसेच शाश्वत विकासासाठी व ऊर्जेच्या कमीतकमी वापरासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे.अपारंपरिक ऊर्जेच्या नव्या स्त्रोतांची विषयी जनजागृती करणे ही आवश्यक असल्याचे असे मत यावेळी व्यक्त केले.भविष्यामध्ये गावाकडे सेंद्रिय शेती करण्याचा मनोदयही तिने बोलून दाखवला.
डॉ.प्रमोद देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्तविक जयंत वाकोडकर यांनी केले व राजीव देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. प्राचार्य अरविंद देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला.

508 Views
बातमी शेअर करा