किनवट/ नांदेड : गेल्या अनेक वर्षा पासून हदगाव तालुक्यातील वाटेगाव व उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत होती, याच पुलाच्या मंजुरीसाठी नागरीकांच्या मागणी वरून खासदार हेमंत पाटिल यांनी पाठपुरावा केल्यामुळे त्यास बांधकाम विभागाने मंजुरी दिल्याने मराठवाडा विदर्भ तेलंगणा राज्याशी दळणवळणाचा प्रश्न मिटणार आहे.यामुळे उमरखेड,महागाव तालुक्यातील बंदी भाग , किनवट, हदगाव,हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
हदगाव तालुक्यातील वाटेगाव आणि उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदी वाहते या नदीवर हरडफ बंधारा आहे, पावसाळ्यात नदीला पाणी असतांना खरीपाच्या दरम्यान बंधारा कोंडल्यावर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यामुळे उमरखेड तालुक्यातील कारखेड देवसरी सह पंचक्रोशीतील नागरीकांना रूकावरून प्रवास करत हदगाव जावे लागते, किंवा पन्नास किंमी चे अंतर कापत उमरखेड मार्गे हदगाव पोहचावे लागते केवळ पैनगंगा नदीवरील पुलामुळे होणारी परवड थांबवण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून पुलास मंजुरी मिळुन द्यावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली होती.
याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला.याबाबत ते म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर – हदगांव या जवळच्या रस्त्यावर, कारखेड फाटा ते वाटेगांव दरम्यान पैनगंगा नदीवर पुल होणे आवश्यक आहे. सदरील पुल झाल्यास मराठवाडा व विदर्भातील २० ते २५ गावांना प्रवास करण्यासाठी व वाहतूकीसाठी जवळपास ४० कि.मी. चे अंतर कमी होईल. तसेच दवाखाना, शिक्षण, बाजार व ऊस वाहतुकी संदर्भात सर्व अडचणी दुर होवून, मराठवाड्यातील हदगांव व नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास सोईस्कर होईल. याचा विचार करून मौ.कारखेड ते वाटेगांव दरम्यान पैनगंगा नदीवर (प्र.जि.मा.-६२) पुल मंजूर करुन निधी उपलब्ध करून द्यावा. खासदार हेमंत पाटील यांनी ही बाब मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती, त्यामुळेच या पुलास मंजुरी मिळाली आहे.याबाबत या भागातील नागरिकांमधून खासदार हेमंत पाटील यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी
442 Views